अरे गाढवा! आधी समजुन घे मग… जितेंद्र आव्हाड यांनी मंत्र्याचा केला एकेरी उल्लेख
निधी मिळत नाही याचाच अर्थ असा आहे की सरकारमध्ये त्यांचं काही चालत नाही. भुजबळ मंत्री आहेत. अभ्यासू आहेत. तरी ते जरांगेवर घसरतात. त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय.
नागपूर | 14 डिसेंबर 2023 : नागपुरच्या हिवाळी अधिवेशनावर राज्यातील विविध समाजांच्या आरक्षणाचे सावट पसरले आहे. मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्याची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलीय. तर, मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण नको असे म्हणत ओबीसी समाज रत्यावर उतरलाय. याशिवाय घनगर, आदिवासी समाजही आरक्षणाचा हक्क मागत आहे. ओबीसी नेते आणि सरकारमधील हेवी वेट नेते छगन भुजबळ हे ओबीसी यांच्या समर्थनार्थ रणांगणात उतरले आहेत. मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात रोजच हमरीतुमरी होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून भुजबळ यांना डिवचलंय.
नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर टीका केलीय. भुजबळ हे अनेक वर्षे तमाम ओबीसीचे नेते आहे. ओबीसीसाठी त्यांनी केलेले काम कुणी विसरू शकणार नाही. ओबीसीसाठी खऱ्या अर्थाने युद्ध हे गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांनी सुरू केले असे आव्हाड म्हणाले.
सरकारमध्ये भुजबळ यांचं कोणी ऐकत नाही. ते म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही. निधी मिळत नाही याचाच अर्थ असा आहे की सरकारमध्ये त्यांचं काही चालत नाही. भुजबळ मंत्री आहेत. अभ्यासू आहेत. तरी ते जरांगेवर घसरतात. त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय. कॅबिनेटमध्ये, सरकारमध्ये तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही राजीनामा द्या, असा टोला आव्हाड यांनी भुजबळ यांना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 24 तारखेपर्यंतची मुदत मागितली आहे. पण, ते खरंच आरक्षण देऊ शकणार आहेत का? असा सवाल आव्हाड यांनी केला. शेड्युल कास्टमध्ये आता वर्गवारी केली जाणार आहे. एक, दोन, तीन, चार असे वर्गीकरण केले जाईल. त्यानंतर शेड्युल कास्ट मध्ये एक विरुद्ध एक वाद होणार. मग जातीजातीत भांडण लागणार आहे, असा आरोप आव्हाड यांनी यावेळी केला.
ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का असे सरकार जाहीर का करत नाही असा सवाल त्यांनी केला. सरकारमधील एक मंत्री मंगल प्रभात लोढा सांगतो की आदिवासी जर दुसरा धर्म स्वीकारत असतील तर त्यांना आरक्षण देणार नाही. अरे गाढवा! त्यांचे प्रश्न काय आहेत ते तरी आधी समजुन घे मग बोल असा एकेरी उल्लेख करत आव्हाड यांनी मंत्री लोढा यांच्यावर टीका केली.