‘तो’ फोटो ट्विट करत रोहित पवार यांचा निशाणा, महाराष्ट्राच्या राजकारणात कुरघोड्यांची ‘त्सुनामी’?
ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यांला फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केली म्हणून मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला इतकी गंभीर जखमी झाली की तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारण आज कोणत्या दिशेला चाललं आहे? असा प्रश्न राज्यातील सर्वसामान्यांना सतावत आहे. राज्यात अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कापूस, कांदा सारखा शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हा माल शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडून आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून, राजकीय नेत्यांकडून भरपूर अपेक्षा आहेत. असं असताना महाराष्ट्रातलं राजकारण अतिशय खालच्या स्थरावर जाताना दिसत आहे. दररोज सत्ताधाऱ्यांकडून विरोधक आणि विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. एकमेकांवर टीकेच्या कुरघोड्या केल्या जात आहेत. ठाण्यात एका महिलेला झालेल्या मारहाणीवरुन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरु झालीय. कुणी फडतूस म्हणतंय तर कुणी काडतूस शब्दोच्चार करतंय. या टीका टीप्पणीत आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही उडी घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्त्यांला फेसबुकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त टीका केली म्हणून मारहाण करण्यात आली. यामध्ये महिला इतकी गंभीर जखमी झाली की तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेची दखल घेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या महिलेच्या भेटीसाठी आज ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित महिलेची सपत्नीक भेट घेतली. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस हे फडतूस गृहमंत्री आहेत, अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर फडतूस म्हणून टीका केल्यानंतर भाजप नेते टीका-टीप्पणीच्या मैदानात तुटून पडले. भाजप आमदार नितेश राणे यांनी अतिशय खालच्या पातळीत उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी टीका केली. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना उघडउघड धमकी दिली. यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अशाप्रकारची टीका केली तर उद्धव ठाकरे जिथे जातील तिथे भाजप रस्त्यावर उतरेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केल्यानंतर नागपुरात देवेंद्र फडणवीस यांनी रात्री सावरकर गौरव यात्रेत भाषण करताना उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना थेट काडतूस शब्दाचा उच्चार केला. उद्धव ठाकरे मला फडतूस म्हणाले. मी फडतूस नाही काडतूस आहे. झुकणार नाही थेट घुसणार, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
रोहित पवारांचा निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी टीका केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महापुरुषांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करत जुनं प्रकरण बाहेर काढलं आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलेलं. त्याच वक्तव्यावरुन रोहित पवारांनी निशाणा साधला.
भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेंव्हा भाजपाने त्याचा ना एका ब्र शब्दानेही निषेध केला, ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून… pic.twitter.com/gP4JkXor70
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 4, 2023
“भाजपचा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संतापजनक वक्तव्य केलं तेंव्हा भाजपाने त्याचा ना एका ब्र शब्दानेही निषेध केला, ना राज्यात छत्रपती शिवाजी महाराज गौरव यात्रा काढली. पण याच भाजपाने आज नागपूरमध्ये सावरकर गौरव यात्रेत महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून सुधांशू त्रिवेदीला व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसवत महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळलं आणि ‘महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो,’ हाच संदेश दिला.शिवरायांना आराध्य दैवत मानणारा महाराष्ट्र भाजपाची ही चाल कधीच विसरणार नाही”, अशी टीका रोहित पवारांनी केली.