विधानसभा निवडणूक जाहीर होताच महायुतीत बंडखोरीची पडली पहिली ठिणगी, या आमदाराने दिले थेट आव्हान
NCP and BJP: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता आमदार सतिश चव्हाण यांनी पत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर केली सडकून टीका आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच बंडखोरीला सुरुवात झाली आहे. बंडखोरीचा पहिला फटका सत्ताधारी महायुतीला बसला आहे. सत्ताधारी महायुतीमधील अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. विधान परिषदेचे आमदार असलेले सतीश चव्हाण महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसेच ते भाजप आमदार विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. यामुळे महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार समोरासमोर येणार आहेत.
पत्र लिहून सरकारवर टीका
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता आमदार सतिश चव्हाण यांनी पत्र लिहून महायुती सरकारच्या कारभारावर केली सडकून टीका आहे. मराठा मुस्लिम धनगर आणि आदिवासी आरक्षणाबाबत सरकारला अपयश आल्याची टीका त्यांनी केली आहे. सतीश चव्हाण यांनी पत्र लिहून महायुती सरकारच्या विरोधात खदखद व्यक्त केली आहे. महायुतीत बंडखोरीची पहिली ठिणगी आता पडली आहे.
भाजप आमदारास देणार आव्हान
गंगापूर मतदार संघात भाजपचे प्रशांत बंब यांच्या विरोधात सतीश चव्हाण बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यांनी त्यासंदर्भात वक्तव्यसुद्धा केले आहे. आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, गंगापूर मतदार संघात गेल्या दोन, तीन वर्षांपासून मी काम करत आहे. या भागाचा विकास झाला नाही. मतदारांमध्ये अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे. त्यामुळे या मतदार संघात बदल हवा आहे.
प्रशांत बंब म्हणाले, माझी तयारी आहे…
राष्ट्रवादी आमदार सतीश चव्हाण यांच्या बंडखोरीबाबत बोलताना आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोणाविरुद्धही निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे. सतीश चव्हाण यांच्या वरिष्ठांना आणि माझ्या वरिष्ठांना ही सगळी माहिती आहे. आता या बाबत वरिष्ठ काय तो निर्णय घेतील. गंगापूर मतदार संघामध्ये 2019 ची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली होती. त्यात भाजपकडून प्रशांत बंब मैदानात होते. ते 1,07,193 मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील यांना 72,222 मते मिळाली. वंचितचे अंकुश कळवणे यांना 15951 मते मिळाली होती.