काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही, ठाकरे गट अजूनही झोपेत…अमोल कोल्हेंंच्या टीकेने राजकारण तापणार?
काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही संताप झाल्याचं दिसून आलं
काँग्रेस पक्षाची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही, तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत बोलताना कोल्हे यांनी, त्यांच्याच सहयोगी पक्षांबाबत हे भाष्य केल्याचं समजतं. त्यांच्या या विधानामुळे राज्यात आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता असून कोल्हेंच्या विधानामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचाही संताप झाल्याचे दिसून आलं. कोल्हेंनी आपल्या पक्षाकडे बघावं, त्याबद्दल बोलावं असा सल्ला वडेट्टीवारांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची संघटनात्मक बैठक वाय.बी . चव्हाण सेंटरमध्ये पार पडली. शरद पवार , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी अनोल कोल्हे यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडी ही निराशेच्या गर्तेत गेली आहे. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकून, त्यांनी पुन्हा नव्या उत्साहाने कामाला लागावं, या उद्देशाने अमोल कोल्हेंनी भाषण दिलं होतं. त्या भाषणादरम्यान कोल्हे यांनी त्यांनी त्यांच्या सहयोगी पक्षाबद्दल वक्तव्य केलं होतं. एकीकडे शिवसेना आणि काँग्रेस यांनी त्यांची मरगळलेली अवस्था अद्याप झटकलेली नाही, त्यामुळे आपल्याला यापुढे जाउन काम करावं लागेल, असं कार्यकर्त्यांना संबोधित करताना कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे काय म्हणाले ?
– राज्यातील परिस्थिती पाहिली तर ठाकरे गट झोपेतून जागा व्हायला तयार नाही.
– काँग्रेसची मोडलेली पाठ अजून सरळ व्हायला तयार नाही.
– आपल्याकडे लढणारे शरद पवार आहेत.”
– सध्या विरोधी पक्षात मोठी जागा शिल्लक आहे, त्यामुळे बचेंगे तो और भी लढेंगे.
वडेट्टीवार संतापले
मात्र त्यांच्या या विधानाचे आता राज्याच्या राजकारणात पडसाद उमटताना दिसत असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार संतापले आहेत. “अमोलरावांनी आपल्या पक्षाकडे थोडं अधिक लक्ष द्यावं आणि आम्हाला सल्ला जर थोडा कमी द्यावा, ” असे म्हणत वडेट्टीवारांनी अमोल कोल्हेंना खोचक सल्ला दिला