पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे सामना नाहीच, पवारांचा पॉवर फुल्ल गेम; बीडमधून ‘या’ नेत्याला उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी बीडमध्ये पावरफुल्ल राजकीय गेम खेळला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांचं नाव चर्चेत असताना शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्योती मेटे यांनी गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जावून भेट घेतली होती. त्यानंतर ज्योती मेटे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार गटासोबत बोलणं सुरु असल्याचं म्हटलं होतं. शरद पवार गटासोबत आमचं सकारात्मक बोलणं सुरु आहे, असं ज्योती मेटे यांनी सांगितलं होतं. पण असं असताना शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली नाही.
शरद पवार यांनी बीडमध्ये पॉवरफुल्ल राजकीय गेम खेळला आहे. अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले बजरंग सोनवणे यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली आहे. बजरंग सोनवणे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीदेखील राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते सर्वाधित मते मिळवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी पंकजा मुंडे यांना टफ फाईट दिली होती. त्यामुळे त्यांना शरद पवार गटाकडून पुन्हा संधी देण्यात आली आहे.
बीडमध्ये तिरंगी लढत?
शरद पवार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे आता ज्योती मेटे या बीडमधून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. ज्योती मेटे यांनी याआधी प्रतिक्रिया देताना आपलं पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु असल्याचं म्हटलं होतं. पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर आपण पुढचा निर्णय घेऊ, असंही त्या म्हणाल्या होत्या. शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळेल, अशी ज्योती मेटे यांना आशा होती. पण त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे आता ज्योती मेटे या अपक्ष लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ज्योती मेटे या अपक्ष लढल्या तर बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ज्योती मेटे या शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत. बीडमध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्यासाठी ज्योती मेटे यांचं मोठं चॅलेंज असण्याची शक्यता आहे.
आणखी कुणाकुणाला उमेदवारी जाहीर?
शरद पवार गटाकडून भिवंडी मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शरद पवार गटाकडून वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, शिरुरमधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.