राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत काटोलच्या उमेदवाराची आदलाबदल करण्यात आली आहे. सलील देशमुख यांना आता काटोलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, 24 ऑक्टोबरला शरद पवार गटाकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यांनतर 26 तारखेला 22 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर लगेच 27 ऑक्टोबरला 9 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज 7 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात येत आहे.
माण विधानसभा मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काटोल विधानसभा मतदारसंघातून सलील देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण आता त्यात थोडा बदल करण्यात आला आहे. अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खानापूर येथून वैभव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वाई मतदारसंघातून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दौंडमधून रमेश थोरात, पुसदमधून शरद मेंद, सिंदखेडा येथून संदीप बेडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवार गटाकडून चारही याद्या मिळवून एकूण 82 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडूनही आतापर्यंत एकूण 83 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून चार याद्या जाहीर करत एकूण 101 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याचाच अर्थ आतापर्यंत महाविकास आघाडीकडून 288 पैकी 266 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर काही जागा या मित्रपक्षांसाठी सोडल्या जाणार आहेत. तसेच काही दोन-तीन जागांबाबत बोलणं सुरु असल्याची चर्चा आहे.