‘लाडकी बहीण योजना लागू करु नका, सरकारला सल्ला देण्यात आला होता’, जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. “माझ्या माहितीप्रमाणे वित्त विभागाने सरकारला सांगितले होते की, ही योजना करू नका. अंमलबजावणी शक्य नाही. वित्त विभागाचा विरोध डावलून अर्थसंकल्पात काही योजना घालण्यात आल्या. त्यामुळे आता आदिवासी आणि मागासवर्गीयांचा निधी डायव्हर्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे”, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे. “हे सरकार फार मर्यादित दिवसांसाठी काम करायचे अशा पद्धतीने काम करते. अजून 40 दिवस त्यांच्या हातात आहे. अजूनही घोषणा होण्याची शक्यता आहे”, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील यांनी यावेळी राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणाच्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली. “फार विलंब होऊन गेला. वर्ष-दीड वर्ष होऊन गेला. खरंतर ज्यावेळी आमचं सरकार पडलं, शिवसेनेत फूट पडली त्याचवेळी एक-दोन महिन्यात निकाल देऊन विषय संपवायला हवा होता. दुर्दैवाने तसं झालं नाही, आणि त्यानंतर आमचा पक्ष फुटला, नंतर आम्ही कोर्टात गेलो, बघूया काय होते”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
‘त्यांना आता दोन महिने अब्दुल सत्तार यांना सोसावं लागेल’
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावरून भाजप नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला. “भाजपने उघड नाराजी व्यक्त केली. मात्र अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे. आणि शिंदे यांचे नेतृत्व भाजपने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्याच्या पलीकडे ते काय करू शकतील? अब्दुल सत्तारच तिथे पालकमंत्री राहणार. ते बदलू शकत नाहीत. त्यांना आता दोन महिने अब्दुल सत्तार यांना सोसावं लागेल”, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
‘विद्यमान सरकार घालवण्याची आम्हाला घाई’
“महाविकास आघाडी एकसंघ निवडणूक लढावी ही आमची इच्छा आहे. आमच्यातला कोणाला मुख्यमंत्री व्हायची घाई नाही. विद्यमान सरकार घालवण्याची आम्हाला घाई आहे. आम्ही महाराष्ट्राला उत्तम सरकार देऊ. मागच्या काही वर्षात या लोकांनी जो गोंधळ करून ठेवला, प्रचंड भ्रष्टाचार सर्वत्र केला. यांना बाजूला करून एकत्रित बसून योग्य निर्णय घेऊ. तुमचे आभार मी मानतो, सातत्याने तुम्ही खात्री देताय की मुख्यमंत्री आमचा होणार आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.
‘विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 175 च्या पार असेल’
मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुती 165 जागा जिंकणार असं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “तुम्हाला चारशे पारची स्टोरी माहित आहे का? तसं हे आहे. 165 म्हटल्यावर भाजप चिडेल. 200 पारचा नारा द्यायचा होता. तुम्ही 165 वरच थांबले. म्हणजे काठावरची भूमिका तुम्ही घेतली. महाविकास आघाडी 175 च्या पार असेल, त्यात मला शंका नाही. लोकसभेच्या वेळी मी सुरुवातीपासून सांगत होतो की, आमच्या 30 ते 32 जागा येतील. त्यावेळी सगळे म्हणायचे कशावरून? एकदा तुम्हाला महाराष्ट्राची नाडी कळाली, तर निर्णय काय ते कळते”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.