विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप, फडणवीसांचंही घेतलं नाव
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. आपल्या कौटुंबिक वादाचा फायदा घेत चित्रा वाघ यांनी आपल्या सुनेला भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विद्या चव्हाण यांच्या घरगुती वादात चित्रा वाघ यांनी हस्तक्षेप केला. तसेच आपल्या घरात असलेल्या वादाचा फायदा घेत चित्रा वाघ यांनी आपल्याविरोधात षढयंत्र रचल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे. विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपही ऐकवल्या. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले. चित्रा वाघ यांनी आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं घडवून आणल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केलाय.
“आम्ही हा ऑडिओ यासाठी ऐकवला की, चित्रा वाघ वारंवार म्हणतात की, आम्ही कुणाच्यामध्ये बोलत नाहीत. आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय. पण हा माझा अनुभव आहे की, माझ्या घरात पाच वर्षांपूर्वी झालं होतं, त्यावरुन चित्रा वाघ माझ्या सुनेला शिकवण्याचा प्रयत्न करतेय. विद्या चव्हाण तुला छळतेय, तुझ्याशी वाईट वागतेय. व्हिडीओ कसे टॅग करायचे ते चित्रा वाघ सांगत आहेत”, असा दावा विद्या चव्हाण यांनी केला.
विद्या चव्हाण यांनी घेतलं फडणवीसांचं नाव
“विशेष म्हणजे चित्रा वाघ यांना ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं स्वत: चित्रा बोलत आहेत. चित्रा वाघ सूनेचं बोलणं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करुन देतात, त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपण या प्रकरणाची जबाबदारी चित्रा वाघ यांना दिली आहे. चित्रा वाघ या तुम्हाला मदत करतील”, असं विद्या चव्हाण यांनी सांगितलं.
“एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं आणि नंतर म्हणायचं की, एक वकील आम्हाला सांगतोय की, शरद पवार अशा प्रकरणात पडतात. हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात? माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशाप्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सूनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं, असं सुरु आहे”, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
‘याचं उत्तर चित्रा वाघ यांच्याकडे काय आहे?’
“मी एका आयपीएसला तपास करायला सांगितलं. तर पार्ले पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात मोर्चे काढा. विद्या चव्हाणला बदनाम करा, पुढे त्याचा मोठा व्हिडीओ बनव आणि हे सगळं दाखव, असं चित्रा वाघ यांनी सूनेला सांगितलं. हे सगलं काय चाललेलं आहे? तुम्ही खोट्या प्रकरणात लोकांना त्रास देण्यासाठी हे चाललेलं आहे. याचं उत्तर चित्रा वाघ यांच्याकडे काय आहे? या क्लिप्स अधिवेशन काळात झाल्या आणि मला पाच-सहा महिन्यांनी या क्लिप्स मिळाल्या”, असं विद्या चव्हाण यांनी सांगितलं.
चित्रा वाघ यांचं विद्या चव्हाण यांना प्रत्युत्तर
- विद्या चव्हाण यांच्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. “मार्च 2020 मध्ये एक डॉक्टर माझ्याकडे आले होते. तिथेच विद्या चव्हाण यांच्या सूनही आल्या होत्या. विद्या चव्हाण यांच्याकडून सुनेला मुलगा हवा होता. पण पहिली मुलगी झाली. मुलगा हवा म्हणून विद्या चव्हाण यांनी सुनेचा छळ केला”, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.
- “यानंतर विद्या चव्हाण यांच्या लहान मुलाने आईसमान असलेल्या वहिनीचा विनयभंग केला. यानंतर गौरी चव्हाण न्यायासाठी शरद पवारांकडे गेल्या होत्या. पण शरद पवार आणि जयंत पाटील यांनी गौरीचं काहीच ऐकून घेतलं नाही. विद्या चव्हाण यांची सून गौरी चव्हाण यांनी मला व्यथा सांगितली”, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.
- “गौरी चव्हाण यांना मी गाईड केलं. हो मी तिला मदत केली. लेकरू आईकडे आहे याचा मला आनंद आहे. विद्या चव्हाण तुम्ही पुन्हा असे फुसके बॉम्ब सोडू नका”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.