पंकजा यांच्या विरोधासाठी दिल्लीच्या हयात हॉटेलात धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा प्लान; राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप
यावेळी त्यांना धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य करत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणीही भाष्य केले.

“धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ या निमित्ताने निर्माण होत आहे. पक्षाचे नेते यांना देखील याची जाणीव की मुंडे गुन्हेगार नाही. धनंजय मुंडे यांनी किती सोसावं?” असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका नेत्याने धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींवर गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य करत गंभीर आरोप केले. यावेळी त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणीही भाष्य केले.
“भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आला”
“नामदेव शास्त्री महाराज यांनी संपूर्ण प्रकरण तपासून आपली भूमिका मांडली पाहिजे होती. भगवान गडाच्या मागून धनंजय मुंडे हे राजकारण करत आहेत. नामदेव शास्त्री महाराज यांची भूमिका मला तरी पटलेली नाही. पंकजा मुंडे यांना सुद्धा धनंजय मुंडे यांनी त्रास दिला आहे. पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर २०१६ ला भाषण करु नये यासाठी काय प्लानिंग करावी यासाठी हे नामदेव शास्त्री महाराज आणि धनंजय मुंडे यांनी दिल्लीतील हयात हॉटेल मध्ये मीटिंग केली होती. त्यानंतर पंकजा ताई यांना भगवान गडावर येण्यापासून रोखण्यात आला”, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी केला.
“धनंजय मुंडे हा समाजाचा सुद्धा होऊ शकत नाही. याने समाजातील लोकांच्या हत्या केल्या आहेत. याला मंत्रिपद प्यार झालं आहे त्यामुळे तो मंत्रिपदासाठी राजीनामा देत नाही. त्याने राजीनामा द्यावा आणि चौकशी होऊ द्यावी. नंतर ते दोषी आढळले नाही तर त्यांना मंत्रिपदासाठी पुन्हा मुख्यमंत्री घेतील ना”, असेही राजाभाऊ फड म्हणाले.
“महादेव मुंडे यांचे मारेकरी अजून मोकाट”
“महादेव मुंडे यांना मी ओळखत होतो. पण गेल्यावर्षी त्यांची हत्या परळीत झाली. त्या हत्येमध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न हा धनंजय मुंडे यांनी केला. मी त्यांचा परळीमध्ये राजकीय विरोधक होतो. त्यामुळे त्यांनी मला टार्गेट केलं होतं आणि या हत्येत मला फसववण्याचा प्रयत्न करण्यात आला. खरे जे महादेव मुंडे यांचे मारेकरी आहेत ते अजून मोकाट आहेत”, असा आरोपही राजाभाऊ फड यांनी केला.
“तब्बल २०० हून अधिक बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं”
“धनंजय मुंडे हे दीड लाख मतांनी निवडणूक तर आले, पण सगळे बोगस मतांचा सगळं कारभार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत बूथ ताब्यात घेण्यात आले आणि बोगस मतदान करण्यात आलं. आणि तोच प्रकार हा विधानसभेत परळी तालुक्यात झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल २०० हून अधिक बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं त्यामुळे धनंजय मुंडे हे दीड लाख मतांनी निवडून आले नाही तर हे शक्य नव्हतं”, असेही राजाभाऊ फड यांनी म्हटले.
“परळीत बूथ ताब्यात घेऊन मतदान केलं”
“त्यासंदर्भात मी आत्ता मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. जे बूथ कोर्टाने सेन्सेटिव्ह ठरवले होते त्या बूथमध्ये सुद्धा यांनी बोगस मतदान केलं आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत परळीत बूथ ताब्यात घेऊन त्या बूथमधून एकाच व्यक्तीने संपूर्ण गावचं मतदान केल आहे आणि मतदारांच्या बोटाला शाई सुद्धा लावली नाही. ही सगळी यंत्रणा या धनंजय मुंडेच्या ताब्यात असल्यामुळे कोण काय करणार असा प्रश्न आहे?” असेही ते म्हणाले.