‘…तर विधानसभा लढणार नाही’, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याची शरद पवार गटाकडून आठवण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर सातत्याने अजित पवार यांच्यावर निशाणा साधला जातोय. शरद पवार गटाकडून आजही तसंच काहीसं करण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करुन देण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने जर बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना निवडून दिलं नाही तर मी पुन्हा विधानसभेची निवडणूक लढणार नाही, असा शब्द भर सभेत अजित पवार यांनी बारामतीच्या जनतेला दिला होता. त्या शब्दाची आठवण करुन देणारा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ट्विट करण्यात आला आहे, आणि पुन्हा निवडणूका न लढवता राहून दाखवावे, अशी खोचक टीका या ट्विटच्या माध्यमातून करण्यात आली आहे. “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगितले. पण जर अजित पवार हे स्वतःच आता पराभव माझ्यामुळेच झाल्याचे मान्य करत असतील तर त्यांनी शब्दाला जागून येणारी विधानसभा न लढवता राहून दाखवावे”, असं शरद पवार गटाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे दोन व्हिडीओ ट्विट करण्यात आले आहेत. यामध्ये पहिल्या व्हिडीओत अजित पवार हे बारामतीतला पराभव हा आपल्यामुळे झाल्याचं म्हणत आहेत. हा व्हिडीओ 5 ऑगस्टच्या भाषणाचा आहे. तर दुसपा व्हिडीओ हा 16 फेब्रुवारीचा आहे. या व्हिडीओत ते आपण उभ्या केलेल्या उमेदवाराला बारामतीकरांनी मतदान केलं नाही तर आपण विधानसभा लढवणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. त्यावरुन शरद पवार गटाने अजित पवारांना डिवचलं आहे.
व्हिडीओत अजित पवार नेमकं काय म्हणत आहेत?
“काही लोक भेटायला आले तर मी काही विचारत नाही. बाबा पराभव माझ्यामुळे झालेला आहे. त्यात बाकी कुणाचा दोष नाही”, असं अजित पवार पहिल्या व्हिडीओत म्हणत आहेत. तर दुसऱ्या व्हिडीओत “आम्ही उभा करु त्या उमेदवाराला विजयी केलं पाहिजे तर आम्ही पुढे विधानसभेला उभे राहू. खरं सांगतो”, असं अजित पवार म्हणाताना दिसत आहे. यानंतर संबंधित व्हिडीओत अजित पवार यांना डिवचण्यासाठी त्यांनी “शब्दाचे पक्के असणाऱ्या अजित पवारांनी आता पराभव झाल्याचं मान्य केलंच आहे तर विधानसभाही लढवू नये म्हणजे झालं”, असं म्हटलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायम ते शब्दाचे पक्के असल्याचे सांगितले. परंतु जर अजित पवार हे स्वतःच आता पराभव माझ्यामुळेच झाल्याचे मान्य करत असतील तर त्यांनी शब्दाला जागून येणारी विधानसभा न लढवता राहून दाखवावे… pic.twitter.com/9guKn1mT9r
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) August 6, 2024
शरद पवार गटाच्या या ट्विटवर अजित पवार गटाकडून काय प्रत्युत्तर देण्यात येतं ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अजित पवार गटात सध्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत समसमान जागावाटप करण्यात यावं यासाठी अजित पवार गट आग्रही आहे. त्यामुळे आगामी विधानसभेत महायुतीत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.