NCP vs. Shiv Sena | कलियुगात नारदमुनींकडून भरीव होण्याची अपेक्षा फोल; परांजपेंची म्हस्केंवर टीका
आनंद परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे.
ठाणेः ऐन ठाणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जोरदार जुंपली आहे. उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला झाले. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर येत आहे. आता त्याच खदखदीला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी तोंड फोडत महापौर नरेश म्हस्के यांच्यावर पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली आहे. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे, अशा शब्दांत त्यांनी म्हस्के यांचा समाचार घेतला.
काय म्हणाले परांजपे?
पत्रकार परिषदेत आनंद परांजपे म्हणाले की, उद्घाटन सोहळा साजरा होताना साऱ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात आपली भूमिका मांडली. मात्र, जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेल्या भूमिकेवर महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीका केली. शिवसेनेने केलेल्या या टीकेचा आम्ही निषेध करतो. कलियुगात नारदमुनीकडून काही भरीव होईल, ही अपेक्षा नरेश म्हस्के यांनी फोल ठरविली आहे. खरे तर नरेश म्हस्के हे संपूर्ण सभागृहाचे नेते आहेत. त्यांनी त्याची खबरदारी कधी घेतली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरसेवकांना ते अपमानास्पद वागणूक देत आहेत. त्यांना मग्रुरी आली असून, हे वर्तन अशोभनीय असल्याचेही ते म्हणाले.
बोलताना भान ठेवा
परांजपे पुढे म्हणाले की, निधी आम्ही दिला हे सांगणे चुकीचे आहे. नशीब उड्डाणपुलाचे काम आमच्या निधीने झाले असं म्हणाले नाहीत. श्रीकांत शिंदे यांचे श्रेय राष्ट्रवादी घेणार नाही. मात्र, बोलताना भान ठेवणे गरजेचे आहे. बापाची चप्पल मुलाच्या पायात आली म्हणजे मुलगा बाप होत नाही, असा खरपूस समाचार घेत त्यांनी दिव्याच्या उड्डाणपुलाची टाईमलाईन जाहीर करावी, असे आवाहन केले. मलंगड येथील काम रखडलेले आहे. मानकोली, मोठगाव हे कधी होणार, विकास 2014 नंतर सुरू झाला. विकासाचे बाळ सात वर्षांचे झाले का, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कळव्यावरची रिअॅक्शन
परांजपे म्हणाले की, मिशन कळवाला कमिशन ठाणे ही रिअॅक्शन आहे. पक्षावर आघात करणार असाल, तर त्याला उत्तर देण्याची जबाबदारी माझी आहे. जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडीची भूमिका जबाबदारीने मांडतील. आम्ही कार्यकर्ते आदेश मानणारे आहोत. खरे तर माझी खासदारांना बोलवण्याची पद्धत नाही, असे नरेश म्हस्के म्हणाले. त्यांच्याकडून आम्ही अधिक अपेक्षा ठेवत नाही.
संबंधित बातम्या
Goa Elections 20022 : उत्पल पर्रिकरांच्या तिकीटावरून रणकंदन, परीकरांना कुणाची ऑफर? वाचा सविस्तर