ND Patil Passed Away | प्रामाणिक लोकनेत्याला मुकलो; सीमाभागातील मराठी भाषकांचा आधारवड कोसळला…!
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रा. एन. डी. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते.
मुंबईः शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील (N D Patil) यांचे आज सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या सामाजिक आणि राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्त्व हरपले आहे. प्रकृती बिघडल्याने कोल्हापूरमधील (Kolhapur) खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळं राज्याच्या सामाजिक, राजकीय जीवनातील लढाऊ नेतृत्व हरपले असून कोल्हापूरसह राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
आदर्श लोकप्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रा. एन. डी. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले. राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहो. दिवंगत प्रा. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेतृत्व हरपले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील साहेब म्हणजे सामान्य माणसाच्या संघर्षाचा कृतीशील विचार होता. सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत ते संघर्ष करीत राहिले. त्यांच्या निधनाने शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचा आधारवड कोसळला आहे. प्रा. एन. डी. पाटील साहेब निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून त्यांनी काम केले. वयाच्या नव्वदाव्या वर्षीही रस्त्यावर उतरुन संघर्ष करणाऱ्या प्रा. एन. डी. पाटील साहेबांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकारमध्ये त्यांनी सहकारमंत्री म्हणून काम केले. आमदार म्हणून काम केले. विधानमंडळातील प्रत्येक क्षण आणि प्रत्येक शब्द हा वंचित बांधवांना हक्क मिळवून देण्यासाठी उपयोगात आणला. प्रा. एन. डी. पाटील साहेब हे आमच्या कुटुंबातील सदस्य होते. त्यांचे निधन हे महाराष्ट्रातल्या, सीमाभागातल्या प्रत्येक कुटुंबाची हानी आहे. मी प्रा. एन. डी. पाटील साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. pic.twitter.com/9OpwWDBS45
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 17, 2022
ऋषितुल्य व्यक्तिमत्व
जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, महाराष्ट्राने जनसामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे. महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले. एन. डी. पाटील यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते असे सांगतानाच जयंत पाटील यांनी एन. डी. पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
चळवळीतील धडाडती तोफ
मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री प्रा. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे सार्वजनिक जीवनातील एक ऋषितुल्य, लढवय्ये, लोकाभिमुख व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ते विधिमंडळातील आणि चळवळीतील धडाडती तोफ होते. त्यांच्या रूपात शेतकरी व कष्टकऱ्यांचा एक बुलंद आवाज हरपला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन लोकांसाठी समर्पित राहिले. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. सार्वजनिक संस्थांचा कारभार कसा चालवावा, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले होते. आचार, विचार आणि कर्तृत्वाने राजकारणात व समाजकारणात त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. त्यांचा जीवनपट व कार्य पुढील अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहील. लोकनेते प्रा. एन.डी. पाटील यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, ही प्रार्थना.
दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, गेले 7 दशकं अनेक सामाजिक-राजकीय घडामोडींचे साक्षीदार, धडाडीचे कामगार नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे. शेतकरी-कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने सोडविले. गिरणी कामगारांच्या हक्कासाठी सुद्धा त्यांनी मोठा लढा दिला. सतत नवीन विचारांचा ध्यास ही त्यांची ओळख होती. सुमारे 22-23 वर्ष त्यांनी विधिमंडळ गाजविले. त्यांच्या निधनाने दूरदृष्टी लाभलेला नेता हरपला आहे.
इतर बातम्याः