Needle free vaccin| सुईला भिऊ नका, तंत्र पाठीशी आहे; आता वेदनारहित लसीकरण, मशीन शरीरावर ठेवले की झाले, नाशिकमध्ये 8 लाख डोस
नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ पाहता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने नीडल फ्री लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिकः कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचे घोंघावणारे वादळ, पुन्हा एकदा तिसऱ्या लाटेची भीती, नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ आणि सुरक्षेचे पायदळी तुडवलेले नियम पाहता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने नीडल फ्री लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांना पायलट प्रोजेक्ट म्हणून निवडण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
45 टक्के जणांचे लसीकरण नाही
नाशिकमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. लसीकरण सुरू होऊन तब्बल 11 महिने लोटले आहेत. त्यात 18 वर्षांवरील 13 लाख 63 हजार नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत. त्यापैकी 11 लाख 87 हजार नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अद्यापही पावणेदोन लाख नागरिक लसीकरणाकडे फिरकलेही नाहीत. ही चिंतेची गोष्ट असून, त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शिवाय एक लाख जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला नाही. त्यामुळे प्रशासन लसीकरण जास्त करण्यावर भर देत आहे.
रुग्ण वाढतायत
राज्यात नाशिक जिल्ह्यात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढ आहेत. सध्याही 436 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यात अजून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. निफाडमधील 74, सिन्नरमध्ये 55 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 545 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अजूनही कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यात लसीकरणाकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ. त्यात ओमिक्रॉन विषाणूची भीती. हे सारे पाहता केंद्र सरकारने नाशिकपासून या पायलट प्रोजेक्टला सुरुवात केली आहे.
असा आहे प्रोजेक्ट
नाशिक जिल्ह्यात सुरुवातीला लसीकरण वेगाने झाले. मात्र, अनेकांनी इंजक्शनची भीती वाटते म्हणून लस घ्यायला टाळाटाळ केली. राज्यभरही असे झाले आहे. त्यामुळे हे पाहता लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने नवीन पायलट प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात निडल फ्री लसीकरण केले जाणार आहे. या नागरिकांना ‘झायकोव -डी’ लस दिली जाणार आहे. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार आहेत.
काय आहे नवे तंत्र?
नाशिक जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पूटनिक या तीन लसी देण्यात येत आहेत. आता नीडल फ्री म्हणून ‘झायकोव-डी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. एका मशीनच्या मदतीने ही लस दिली जाते. त्वचेवर मशीन ठेवली जाईल. त्यानंतर टोचणी न करता लसीचे घटक शरीरात सोडले जातील. केंद्र सरकारने पायलट प्रोजेक्ट म्हणून निवड केल्यांतर नाशिक आणि जळगाव जिल्ह्याला प्रत्येक 8 लाख डोस दिले आहेत.
इतर बातम्याः
Nashik ZP | झेडपीतले कारभारी वाढणार; गटात 11 आणि गणात 22 ची वाढ, तरण्याबांड नेतृत्वाला संधी…!