ठाकरे बंधूंच्या युतीवर नीलम गोऱ्हे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या त्यांनी एकनाथ शिंदेंना घाबरून..
शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे, यावरून राजकीय वर्तुळात समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “कुठल्याही मोठ्या गोष्टी, आमच्यातले वाद, आमची भांडणं किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्त्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी ही भांडणं, वाद अत्यंत क्षुल्लक गोष्टी आहेत. एकत्र येणं, एकत्र राहणं या फार कठीण गोष्टी आहेत, असं मला वाटत नाही,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील स्वागत केलं आहे. मी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी मी एकत्र यायला तयार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे, यावरून राजकीय वर्तुळात समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
बाळासाहेबांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे काम करत आहेत, त्यामुळे बाकीच्यांनी कसा मार्ग काढायचा हा त्या -त्या नेत्यांना ठरविण्याचा अधिकार आहे. फक्त त्यांनी एकनाथ शिंदेंना घाबरून जाऊ नये, असा टोला यावेळी गोऱ्हे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की येत्या काही दिवसांमध्ये याबाबत चित्र स्पष्ट होईल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत मला बरच काही वाटतं, पण व्यक्त करणं योग्य वाटत नाही, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. त्या राजगुरुनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या, दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे, आता पुन्हा एकदा त्यांनी खोचक टोला लगावला आहे.