धनुष्यबाण आणि पक्षाचा निर्णय प्रलंबित असतांना शिंदे गटाची नाशिकमध्ये मोठी खेळी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचा निर्णय काय?
आठ सदस्यांच्या समितीमध्ये भाऊसाहेब चौधरी, दादा भुसे, हेमंत गोडसे, सुहास कांदे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे आणि राजू लवटे यांची नावे आहेत.
नाशिक : शिवसेनेच्या फूटीनंतर पक्षासह धनुष्यबाण चिन्हाची लढाई एकीकडे सुरू असतांना दुसरीकडे शिंदे गटाने नवीन खेळपट्टी करण्याचे काम सुरू केलं आहे. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता शिंदे गटाने एक विशेष समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये एकूण आठ सदस्य असणार आहे. त्यामधील सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमधील संपर्कप्रमुख पदाची नियुक्ती झालेली नसल्याने एक पद रिक्त ठेवण्यात आले आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट नसले तरी शिंदे गटाच्या माध्यमातून निवडणुकीच्या बाबतीतील सर्वच निर्णय हे नाशिकमधील आठ जणांची समिती घेणार आहे. नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीत शिंदे गटही आपली ताकत दाखविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकसाठी निवडण्यात आलेल्या आठ सदस्यांच्या समितीत सात जणांची नावं निश्चित ठेवण्यात आली आहे.
आठ सदस्यांच्या समितीमध्ये भाऊसाहेब चौधरी, दादा भुसे, हेमंत गोडसे, सुहास कांदे, अजय बोरस्ते, प्रवीण तिदमे आणि राजू लवटे यांची नावे आहेत.
यामध्ये भाऊसाहेब चौधरी यांच्याकडे बाळासाहेबांची शिवसेनेचे सचिव पद आहे, दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री आहेत, तर हेमंत गोडसे नाशिकचे खासदार आहे.
याशिवाय सुहास कांदे आमदार आहेत, अजय बोरस्ते जिल्हाप्रमुख आहे, तर प्रवीण तिदमे हे महानगरप्रमुख असून राजू लवटे हे सहसंपर्कप्रमुख पदी आहे.
निवडणुकीच्या बाबत तारीख पे तारीख सुरू असतांना आणि निवडणुकीचे कुठलेही संकेत नसतांना शिंदे गटाने पूर्वतयारी सुरू केली असून विशेष समिती तयार केली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे निर्णय आणि योजना जनतेपर्यन्त पोहचविण्याचे काम ही समिती करणार असून निवडणुकीचे सर्व अधिकार या समितीला असणार आहे.