ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासाबाबत राज्यात नवी नियमावली; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त असल्यामुळे त्याचा देशात शिरकाव होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्राकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारने देखील परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
मुंबई : कोरोना संकट कमी होत आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने ( Omicron) जगभरात धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या विषाणूचे वर्णन चिंताजनक असे केले आहे. ओमिक्रॉनच्या प्रादुर्भावाचा वेग जास्त असल्यामुळे त्याचा देशात शिरकाव होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली जात आहे. परदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्राकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रापाठोपाठ आता राज्य सरकारने देखील परदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
‘असे’ असतील नवे नियम
नव्या नियमावलीनुसार एखाद्या प्रवाशाला जर परदेशातून राज्यात यायचे असल्यास त्याला त्याने गेल्या 15 दिवसांमध्ये कुठेकुठे प्रवास केला होता, त्याचा तपशील सादर करणे बंंधनकारक करण्यात आले आहे. चुकीचा तपशीर सादर केल्यास संबंधित प्रवाशावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला आहे. ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव झाला आहे, अशा देशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था वेगळी करण्यात येणार आहे. आरटीपीसीआर चाचणी झाल्यानंतरच त्यांना विमानतळाच्या बाहेर पडता येणार आहे. चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येईल किंवा 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा आरटीपीसीआर सक्तीची करण्यात आली आहे. ज्या लोकांना राज्यांतर्गत हवाई प्रवास करायचा आहे, त्यांना कोरोना लसीचे दोन डोस, किंवा प्रवासाच्या 48 तास आधीचे कोरोना चाचणी निगेटिव्हचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी देखील हेच नियम लागू राहणार आहेत.
नियमांचे उल्लंघन केल्यास दंड
दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नियम कडक करण्यात आले आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, नियमित हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, मास्क लावावे असे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या स दंडाच्या रकमेमध्ये देखील वाढ करण्यात आली. एखादा व्यक्ती विनामास्क आढळल्यास त्याच्याकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. तसेच विना मास्क ग्राहकाला सामान दिल्यास दुकानदारांकडून तब्बल 10 हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ; भास्कर जाधवांचा सुनील तटकरेंना टोला
IPL 2022 Retention : मुंबईने 4 तर बँगलोरने 3 खेळाडूंना रिटेन केलं, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे