आता स्वस्तात करा प्रवास; टॅक्सी सेवेत सहकार पॅटर्न, OLA आणि UBER पेक्षाही मोजावे लागतील कमी पैसे
NFTC to launch Sahakar taxi: मोठ्या शहरात प्रवाशांची वाढत्या टॅक्सी भाड्यातून लवकरच सूटका होणार आहे. या क्षेत्रातील काही कंपन्यांची दादागिरी लवकरच संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. नॅशनल टुरिझम अँड ट्रान्सपोर्ट कोअऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड लवकरच नवीन परिवहन सेवा सुरु करत आहे.सहकार टॅक्सी या नावाने ही सेवा सुरु करण्यात येईल.
रोजच्या वाढत्या प्रवास खर्चाने वैतागला आहात? भाड्यापोटी होणारी कटकट टाळण्यासाठी पर्याय शोधत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठीच. देशातील अनेक शहरात टॅक्सी भाडे (Taxi Fare) जास्त आहे. त्यातच टॅक्सी चालकांची मनमानीही प्रवाशांना अनेकदा सहन करावी लागते. ओला आणि उबेर या कंपन्यांची सेवाही स्वस्त नाही. अशावेळी राष्ट्रीय पर्यटन आणि वाहतूक सहकार महामंडळाने(National tourism and transport cooperative federation ltd) स्वस्तात प्रवास योजनेचा विडा उचलला आहे. जनतेला माफक दरात प्रवास करता यावा यासाठी महामंडळ लकवरच ‘सहकार टॅक्सी’ (Sahakar Taxi) सेवा सुरु करणार आहे. लवकरच या योजनेला मूर्त स्वरुप येईल. लोकांना सुरक्षित आणि माफक दरात सेवा देण्यासोबतच लाखो तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्याचा ही प्रयत्न या योजनेद्वारे करण्यात येणार आहे. महामंडळाच्या दाव्यानुसार, देशभरात दहा लाख तरुणांना या योजनेतून रोजगार (Jobs) मिळणार आहे.
ओला आणि ऊबेरला टक्कर
ही सेवा देशातील प्रमुख शहरात सेवा देणा-या ओला आणि ऊबेर या प्रवाशी वाहतुकीतील दादा कंपन्यांना टक्कर देणार आहे. या दोन्ही प्रवाशी वाहतूक करणा-या कंपन्यांपेक्षा भाडे कमी ठेऊन सहकार टॅक्सी बाजारात तीव्र स्पर्धा तयार करणार आहे. प्रवाशांना स्वस्तात सेवा देण्याचा प्रयत्न महामंडळ करणार आहे. ओला आणि ऊबेर सारख्या सुविधाही सहकार टॅक्सी देणार आहे.
10 लाख लोकांना रोजगार
महामंडळाने या प्रकल्पातून दहा लाख लोकांना रोजागराची संधी उपलब्ध होईल, असा दावा केला आहे. येत्या काही वर्षात देशभर सहकार टॅक्सी सेवा लागू करण्यात येईल. या सेवेमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देशभरातील 40 लाख लोकांना फायदा होण्याचा ही दावा करण्यात आला आहे. हा सहकार केवळ वाहतूक आणि प्रवास यामध्ये बघायला मिळणार नाही तर सहकार जल, सहकार रेस्टॉरंट, सहकार फुड अशी एक साखळी यामाध्यमातून गुंफण्यात येणार आहे.
कुरियर सेवा ही सुरु करणार
सहकार टॅक्सी सेवा ही ओला आणि ऊबेर सारखीच सेवा बजावेल. महामंडळाने आणखी एक बाब स्पष्ट केली आहे की, प्रवाशी वाहतुकीसोबतच, या नेटवर्कच्या माध्यमातून करियर सेवाही पोहचवण्यात येणार आहे. सहकारी संस्था, पर्यटन आणि वाहतूक सेवा यांच्या मिलाफातून ही सेवा कार्यान्वीत होईल.
युट्यूब चॅनलचीही सुरुवात
महामंडळ अनेक उपक्रम राबवित आहे. त्यात राष्ट्रीय पर्यटन आणि वाहतूक सहकार महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धघाटन आणि त्यांच्या युट्यूब चॅनलचाही श्रीगणेशा करण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात(NCR) हे मध्यवर्ती कार्यालय आहे. नुकतेच ते सुरु करण्यात आले आहे. सहकार भारतीचे अध्यक्ष डी एन ठाकूर यांनी त्याचे उद्धघाटन केले. हा प्रकल्प राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.