सिंधुदुर्ग : गेल्या अधिवेशनात सर्वात जास्त चर्चेत राहिलेले तत्कालीन तालिका अध्यक्ष भास्कर जाधव, या अधिवेशनातही ते पहिल्याच दिवशी चर्चेत आले आहेत. कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली, त्यानंतर भाजपही जोरदार आक्रमक झाले आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधव यांच्यावर विधानसभेत हल्लाबोल चढवला आणि आता भाजप आमदार नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर खरपूस टीका केली आहे.
काल राष्ट्रवादीचा सोंगाड्या, आज शिवसेनेचा, उद्या भाजपचा
”भास्कर जाधव हा कुठला रोग आहे, हे कोकणातील लोकांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. नाटकामध्ये जसा नरकासूर जसा कुठलेही सोंग ठेवत नाही, वेगवेगळे सोंग बदलत असतो. तशी भास्कर जाधवांची अवस्था आहे” अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. ”काल तो राष्ट्रवादीचा सोंगाड्या होता, आज तो शिवसेनेचा सोंगाड्या आहे. उद्या तो भाजपचा पण सोंगाड्या होईल. अशा सोंगाड्या लोकांना समाजात काय किंमत आहे? हे चिपळूणच्या आणि कोकणातल्या लोकांना विचारा.” असेही नितेश राणे म्हणाले आहेत.तसेच ”यांची कोकणामध्ये लायकी उरलेली नाही आहे. ज्या पंतप्रधानांचे जगामध्ये नाव आहे, जगामध्ये ज्यांची ओळख आहे, या सोंगाड्याला त्यांची काय किंमत कळणार? अशा सोंगाड्याना किती महत्व द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे.” अशी खरपूस टीका नितेश राणे यांनी केली आहे.
भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागितली
गेल्या पावसाळी अधिवेशनातही भास्कर जाधव चर्चेच्या मध्यस्थानी होते. भाजपच्या काही सदस्यांना विधानसभेत त्यांचा माईक ओढण्याचा प्रयत्न आणि इतर गदारोळ केल्यावरून 12 आमदारांवर 1 वर्षासाठी निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. या अधिवेशनात मात्र विधानसभा अधिवेशनात आज पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. आमदार भास्कर जाधव यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विधानसभेत एकच घोषणाबाजी सुरु झाली. देशाच्या पंतप्रधानांची या सभागृहात नक्कल करणे, हे शोभनीय वक्तव्य नाही. भास्कर जाधव यांनी जाहीर माफी मागावी किंवा त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावं, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी बिनशर्त माफी मागितली, मात्र त्यांच्यावर आता भाजपकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.