Nitesh Rane: नितेश राणेंचा 5 लाखांचा गुड बिहेवियर बाँड भरण्यास नकार; नेमकं कारण काय?
Nitesh Rane: भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी गुड बिहेवियर बाँड (चांगल्या वर्तनाचा बाँड) (good behaviour bond) भरण्यास नकार दिला आहे. त्यांना पाच लाखाचा बाँड भरण्यास सांगितलं होतं.
मुंबई: भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी गुड बिहेवियर बाँड (चांगल्या वर्तनाचा बाँड) (good behaviour bond) भरण्यास नकार दिला आहे. त्यांना पाच लाखाचा बाँड भरण्यास सांगितलं होतं. नितेश राणे यांना सीआरपीसी 110 अंतर्गत नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांनी सहायक पोलीस आयुक्तांच्या नोटिशीला उत्तर देताना बाँड भरणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलं होतं. नितेश राणे यांच्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नितेश राणे यांच्या वकील नमिता मानेशिंदे यांच्या माध्यमातून कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यात आलं आहे. 1 एप्रिल 2022 रोजी जारी करण्यात आलेली नोटीस चुकीची आणि निराधार आहे, असं या उत्तरात म्हटलं आहे. तसेच ही नोटीस मागे घेण्याची विनंतीही एसपींना करण्यात आली आहे.
नितेश राणे यांनी बाँड जमा करण्यास नकार दिल्यानंतर या प्रकरणावरील सुनावणी 20 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी मालवणी पोलीस ठाण्यातील प्रकरणी सेशन कोर्टाने दिलेल्या अंतरीम जामिनाचाही त्यात उल्लेख करण्यात आला आहे. जामीन मिळाल्यानंतर राणे यांना सीआरपीसी 110 अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. वास्तविकरित्या या प्रकरणात कोणताही गंभीर गुन्हा दिसत नसल्याचं सत्र न्यायाधीशांना आढळून आलं होतं. काही तरी हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिवादीच्या विरोधात कोणताही गुन्हा ठरत नाही, असं निरीक्षणही नोंदवण्यात आलं होतं.
आठ तास चौकशी
दरम्यान, दिशा सालियन प्रकरणी मानहानीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची पोलिसांनी चौकशी केली होती. दोन्ही बापलेकांची सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर या दोघांनाही कोर्टात धाव घेऊन जामीन मिळवला होता.
काय आहे प्रकरण?
8 जून 2020 रोजी दिशा सालियनने मालाडच्या एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. त्यानंतर सहा दिवसानंतर सुशांत सिंग राजपूत यांनीही आत्महत्या केली होती. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या प्रकरणावरून अनेक आरोप आणि दावे केले होते. त्यानंतर दिशाच्या आईने राणेंनी आपल्या मुलीच्या विरोधात मानहानीकारक आणि भ्रामक दावे केल्याचा आरोप केला होता.
संबंधित बातम्या:
Pune MNS: पुण्यात मनसेसमोर आणखी एक संकट, आणखी 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, वसंत मोरे काय करणार?
महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र झुकणार नाही – नितेश राणे