म्याऊ म्याऊच्या घोषणांचा राग का आला? आदित्य ठाकरेंना विचारा…शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले-नितेश राणे
आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं कारण वाघाची मांजर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे.
मुंबई : आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नितेश राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पहायला मिळाला कारण नितेश राणे यांनी विधानभवनाबाहेर आंदोलन करताना आदित्य ठाकरे येताच म्याऊ म्याऊच्या घोषणा दिल्या आहेत. त्यावरूच आता पुन्हा वाद पेटला आहे. तसेच नितेश राणे शिवसेना नेते अनिल परब यांच्यातही जोरदार घमासान पहायला मिळाले. अनिल परबांच्या पोटात दुखलं मला विधानसभेत पुढे बसायला मिळाले म्हणून असा खोचक टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
राणीबागेतल्या फलकावरूनही वाद
राणीबागेत असणाऱ्या त्या फलकाबद्दल आणि दर्ग्याबद्दल मुंबई महापालिकेने तसंच शिवसेनेने स्पष्टीकरण दिले पाहिजे असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांना पाहून म्याऊ म्याऊ जाणीवपूर्वक केलं कारण वाघाची मांजर झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही, अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे. याच घोषणा देताना तिघे भाऊ 100 कोटी वाटून घेऊ असे फलकही भाजप नेत्यांच्या हातात दिसून आले. पुढे सुरूवातील अनिल परब यांनी सुरूवातील आवाज उठवला मात्र नंतर ते तोंडावर पडले अशी टीका त्यांनी अनिल परब यांच्यावर केली आहे.
हिंदुंच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागावी
हिंदुच्या भावना दुखावल्या त्याबद्दल शिवसेनेने आधी माफी मागावी, नंतर बोंबलत बसावे, शिवसेना माफी कधी मागणार? अशी टीकाही त्यांनी केली आहे. मी योग्य पद्धतीने काम करत आहे, माझ्या या कृतीने मला धीरुभाई अंबानींचे वाक्य आठवलं, ज्यावेळी तुम्ही योग्य करता त्यावेळी तुम्हाला जास्त विरोध होतो, म्हणूनच मला टार्गेट केले जात आहे, त्यामुळे मी आणखी आक्रमकतेने सरकारवर तटून पडणार असेही नितेश राणे म्हणाले आहेत. विविध मुद्द्यांवरून सध्या विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीला घेरण्याचे काम सुरू आहे. राज्यातली शेतकऱ्यांची वीजतोडणी या मुद्द्यावरून विरोधकांचे आंदोलन सुरू होते त्यावेळी ही घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरून आता आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.