सर्वच राजकीय पक्षांकडून नितीन गडकरी यांच्या कामांचे कौतूक, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी…
Nitin Gadakari | केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खुली ऑफर दिली होती. महाविकास आघाडीत या आम्ही तुम्हाला निवडून आणू. त्यावर मंगळवारी नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली होती. गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर फेटाळली होती.
नागपूर | 13 मार्च 2024 : भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. त्या ऑफरला भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. भाजपचे महाराष्ट्रातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. यामुळे नितीन गडकरी यांची उमेदवारी अद्याप जाहीर केली गेली नाही. नितीन गडकरी यांच्या कामांचे विरोधी पक्षाकडून अनेक वेळा कौतूक झाले आहे. आता हाच मुद्दा हेरुन नागपूरकर नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याच्या मागणीसाठी पुढे सरसावले आहे.
नागपुरातील सामाजिक संस्था एकत्र
नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रत येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. नागपुरातच नाही तर देशातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत आहेत. यामुळे त्यांना बिनविरोध लोकसभेत खासदार म्हणून पाठवा, अशी मागणी करणारे फलक नागपुरात सामाजिक संघटनांचे दिसत आहेत. नागपुरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ उभे राहत ही मागणी करण्यात आली आहे.
विरोधकांची भेट घेणार
विरोधकही गडकरींच्या कामच कौतुक करत असल्यानं त्यांनीही उमेदवार उभा न करता बिनविरोध निवडून द्यावे. विरोधी पक्षातील लोकांना भेटून त्यांना आम्ही यासंदर्भात समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, असे सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दत्ता शिर्के यांनी सांगितले. अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकत्र येऊन विरोधी नेत्यांकडे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांची ऑफर
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खुली ऑफर दिली होती. महाविकास आघाडीत या आम्ही तुम्हाला निवडून आणू. त्यावर मंगळवारी नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली होती. गडकरी यांनी उद्धव ठाकरे यांची ऑफर फेटाळत, हे अपरिपक्ततेचे लक्षण असल्याचे म्हटले आहे. भाजपमध्ये तिकीट देण्याची एक पद्धत आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्या तिकिटाची चिंता करु नये, असे गडकरी यांनी म्हटले होते.