आता माझे नावच माझा टॅग…. पक्ष सोडताना ठाकरे गटाच्या नेत्याने फोडली डरकाळी
मी स्वाभिमानाने जगणारा माणूस आहे. पक्षासाठी खूप काही केले आहे. माझी मातोश्रीवर कुठलीही नाराजी नाही. मातोश्रीने मला नेहमी कायम सन्मान दिला आहे. जी नाराज आहे ती खालच्या पातळीवरती आहे.
मुंबई | 8 नोव्हेंबर 2023 : शिवसेना पक्षासाठी मी मोठे योगदान दिले होते. ते मी शब्दात सांगू शकत नाही. अनेक राजकीय गुन्हे माझ्यावर टाकण्यात आले. मात्र, मी कुठेही डगमगलो नाही. अनेक ऑफर आल्या. मात्र, मी शिवसेनेमध्ये तटस्थ होतो. आता कुठल्याही पक्षात जाणार नाही. माझ्या कामगार सेनेचे काम करत राहणार. समाजाचे काम करत राहणार आहे. मध्यंतरी पक्षाच्या नेते, उपनेते पदांची यादी जाहीर झाली. त्यात माझे नाव नव्हते. त्यामुळे मला एक प्रकारची नाराजी दिसून आली. आजूबाजूच्या मंडळीमुळे माझी गळचेपी होत असेल तर मी ते कदापि सहन करणार नाही. एकीकडे अपमान आणि एकीकडे लालूच असे मी सहन करू शकत नाही अशा शब्दात शिवसेनेच्या बड्या नेत्याने आपली नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
कुठल्याही राजकारणात अडकायचं नाही
नवी मुंबई संपर्कप्रमुख आणि रत्नागिरी शहर संपर्कप्रमुख निलेश पराडकर यांनी आपल्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. निलेश पराडकर उर्फ आप्पा हे ठाकरे गटाचे बडे नेते मानले जातात. मी स्वाभिमानाने जगणारा माणूस आहे. पक्षासाठी खूप काही केले आहे. माझी मातोश्रीवर कुठलीही नाराजी नाही. मातोश्रीने मला नेहमी कायम सन्मान दिला आहे. जी नाराज आहे ती खालच्या पातळीवरती आहे. ती आता सांगणार नाही. माझे सर्वांशी संबंध चांगले आहेत. पण, मला आता कुठल्याही राजकारणात अडकायचं नाही, असे पराडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचा खूप आदर करतो
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यांनी थांबायला सांगितले आहे. पदाचा राजीनामा देऊ नको असे सांगितले. मात्र, मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याचे ठरवलेलं आहे. त्यांना मी आता फेस करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांचा मी खूप आदर करतो त्यांचा आदर मी कायम करत राहील असेही ते म्हणाले.
शिवसेना हे नाव काढलं जाईल
अनेक लोक माझ्या पाठीशी आहे त्यांना सांगितलं आहे तुम्ही त्याच ठिकाणी राहा. आता माझ्या पाठीशी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव असेल. मात्र, पक्षाचं नाव उतरवले जाणार आहे. कार्यालयाच्या बाहेरील शिवसेना हे नाव काढलं जाईल. माझ्या संस्थेचं नाव त्या ठिकाणी लावणार आहे असे पराडकर यांनी स्पष्ट केले.
माझे नाव हाच माझा टॅग असेल
जे पक्ष सोडून जात आहे ते वैयक्तिक स्वार्थासाठी जात आहेत. माझा कुठलाही स्वार्थ नाही. मला आमदार, खासदार बनायचे नाही. फटाके फोडण्याची माझी लहानपणापासून सवय आहे. माझी फटकेबाजी सोडणार नाही. आता मला कुठल्याही पक्षाचा टॅग लावून घ्यायचा नाही. माझे नाव हाच माझा टॅग असेल, असे त्यांनी सांगितले.