..ही कविता अजूनही रात्र रात्र झोपू देत नाही! 81 व्या वाढदिवसाला पवार यांनी काढली अस्वस्थ करणारी आठवण
राजकारणात आल्यापासून असंख्य लोकांना भेटलो, बोललो, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, हे सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका अस्वस्थ करणाऱ्या कवितेचा उल्लेख केला. निमित्त होतं, त्यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर इथे आयोजित एका कार्यक्रमाचं!
मुंबईः लोकांचं म्हणणं, समस्या, अनुभव ऐकण्यासाठी, समजण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरलेले नेते म्हणजे शरद पवार. आज त्यांचा 81 वा वाढदिवस (Sharad Pawar Birth day ). नेहरू सेंटर येथे पवार(Sharad Pawar) यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव करणारे सामान्य लोक, अनुभव वृद्धींगत करणाऱ्या लोकांचा खास उल्लेख केला. या लोकांमुळेच मी समृद्ध झालोय आणि अजूनही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप काम करायचंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत अस्वस्थ असतं, असं सांगताना त्यांनी एका कवितेचा आवर्जून उल्लेख केला.
कोणत्या कवितेबद्दल बोलले शरद पवार?
भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, ” कवीचं नाव मोतीराज राठोड असावं. त्यांची कविता आठवते. मोतीराज हा बंजारा समाजातील कार्यकर्ते. पालंमध्ये राहणारा. मी सहज त्याला म्हटलं काय हल्ली विचार करतो. तो म्हणाला विचार करतो तुमच्या सर्वांच्या विरुद्ध! मी म्हटलं म्हणजे काय? तो म्हणला माझी एक लहानशी कविता आहे. कविता काय आहे . कवितेचं नाव होतं पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन दगड फोडणारे.” शरद पवार यांनी भाषणात पुढे या कवितेत कवीने नेमकं काय म्हटलं आहे, त्यानं कोणती वेदना मांडली आहे, याविषयी सांगितलं.
ही कविता, कित्येक रात्री झोपू देत नाही- पवार
कवितेतील भाव, कवीच्या वेदना सांगताना पवार भाषणात म्हणाले, ” कवी म्हणतो, हा मोठा दगड आम्ही घेतला. आमच्या घामानं, कष्टानं, हातोड्यानं आणि हातातल्या छन्नीनं त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर केलं. आणि मूर्तीत रुपांतर केल्यानंतर सर्व गाव आलं. मूर्ती बनविणाऱ्याकडे कुणी ढुंकून बघत नव्हतं. सगळं गाव आलं आणि गावाने वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात स्थापित केली. गंमत काय माझ्या घामाने मूर्ती तयार झाली. पण मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिरात मी दलित आहे. म्हणून मला आता प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे. पण तिचा बापजादा मी आहे. त्या मूर्तीचा बापजादा मी आहे. मी असताना तुम्ही मला मंदिरात येऊ देत नाही. ही तुमची समाज रचना आम्हाल उद्ध्वस्त करायची आहे, खरं सांगतो अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वत गुन्हेगार आहे असं वाटतं. आपण काही केलं असो नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या उपेक्षित समाजावर जे अन्याय अत्याचार झाले, त्याची जी अस्वस्थता आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे.”
लोकांमध्ये मिसळायला, ऐकायला बरं वाटतं- पवार
वाढदिवसानिमित्तच्या भाषणात शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरत असतो. लोकांना भेटल्यावर मला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं. त्यांचं गाऱ्हाणं ऐकायला मिळतं. अनेक ठिकाणी मी जातो. अनेकदा मी छोट्या समाजातून आलेल्या लोकांसोबत दिवस घालवले आहे. अनेकांना ऐकायला बरं वाटतं. अलिकडच्या काळात लिहिणारे विचार करणारे अनेक लोक तयार झालेले मिळतात. कालच मी एक गोष्ट सांगितली. एकदा मी औरंगाबादला होतो. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मिलिंद कॉलेज आहे. सरस्वती शिक्षण संस्था आहे. तिथे दलित वर्गातील तरुण तरुणी औरंगाबादला शिकायला येतात. कारण तिथे पहिलं महाविद्यालय बाबासाहेबांनी काढलं. बाबासाहेबांनी कॉलेज काढलं म्हणून तरुण तरुणींना आकर्षण आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत अनेक संध्याकाळी गप्पा मारल्या आहेत. त्यांच्या मनात काय आहे. अन्याय अत्याचारवर त्यांचं काय म्हणणं आहे. ते ऐकायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याला मदत होईल.”
इतर बातम्या-