उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, पण, ‘हा’ आमदार म्हणाला ते तर ‘बरसाती मेंढक’
आता अमरावती जिल्ह्यात येऊन बरसाती मेंढक्यासारखे येऊन मताची भीक मागताय. मुख्यमंत्री असताना मात्र तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे तुम्ही विदर्भात कितीही आले तरी जनता तुम्हाला ओळखून आहे. तुम्ही फक्त बरसाती मेंढक आहात...
यवतमाळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून यवतमाळमधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दुपारी उद्धव ठाकरे यांचे यवतमाळमध्ये आगमन झाले. पोहरादेवी येथे बामनलाल महाराज मंदिर येथे त्यांच्या हस्ते होम पूजेमध्ये नारळ अर्पण करून आहुती टाकली जाणार आहे. त्यामुळे पोहरादेवी येथे सुरक्षेच्या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करणार असून येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. मात्र, यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून टीका होऊ लागलीय. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केलीय.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यता हनुमान चालीसावरून मोठा वाद निर्माण झाला होता. खासदार नवनीत राणा यांनी तर थेट मातोश्री बंगल्यामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्याचा थेट इशारा दिला होता. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून खासदार नवनीत राणा यांना काही दिवस अटक करण्यात आली होती. तोच संदर्भ देत आमदार रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलंय.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे घराबाहेर पडले नाही. कोरोना काळात राज्याला वाऱ्यावर सोडून हे मातोश्रीवर बसले होते. आता पक्ष फुटल्यानंतर ते विदर्भाचा दौरा करत आहेत. आता तर तुमचे 40 आमदार सोडून गेले ते फक्त हनुमान चालीसाला विरोध केला म्हणून अशी टीका रवी राणा यांनी केली.
आता अमरावती जिल्ह्यात येऊन बरसाती मेंढक्यासारखे येऊन मताची भीक मागताय. मुख्यमंत्री असताना मात्र तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे तुम्ही विदर्भात कितीही आले तरी जनता तुम्हाला ओळखून आहे. तुम्ही फक्त बरसाती मेंढक आहात अशी बोचरी टीका त्यांनी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे पोहरादेवी येथे जगदंबा माता दर्शन, संत सेवालाल महाराज समाधी दर्शन ,बाबूसिग महाराज दर्शन, संत रामराम महाराज समाधी दर्शन घेणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते नगारा वाजवून, होम पूजेत नारळाची आहुती देऊन पूजाअर्चा करणार आहेत. पोहरादेवी येथून उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेकडो गाड्यांचा ताफा पुढे मंत्री संजय राठोड यांच्या दिग्रस मतदारसंघात धडकणार आहे.