Rohit Pawar | कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांना पुन्हा मोठा धक्का, राम शिंदेंनी पलटली बाजी
Rohit Pawar | कर्जत-जामखेडमध्ये भाजपा नेते राम शिंदे यांनी रोहित पवार यांना पुन्हा मोठा धक्का दिला आहे. नुकत्याच झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत कर्जत-जामखेडमध्ये आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व दिसून आलं.
कर्जत (कुणाल जायकर) : मागच्याच आठवड्यात राज्यात ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झालेत. या निकालात महायुतीने मोठी मुसंडी मारली. भाजपाने सर्वाधिक ग्रामपंचायची जिंकल्या. त्या खालोखाल अजित पवार गट सरस ठरला. राज्यातील काही प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतींमध्ये सुद्धा धक्कादायक निकाल लागले. खासकरुन कर्जत-जामखेडच्या ग्रामपंचायत निकालांवर राजकीय जाणाकारांच लक्ष होतं. कर्जत-जामखेडमधून शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे दिग्गज नेते राम शिंदे यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या निकालाकडे लक्ष होतं. ग्रामपंचायत निवडणुकीत राम शिंदे यांनी रोहित पवारांना धक्का दिला.
कर्जत-जामखेडमध्ये मिळून एकूण 9 ग्राम पंचायती आहेत. यात भाजपाचे आमदार राम शिंदे यांच्याकडे 5 ग्रामपंचायती तर आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 ग्रामपंचायती आहेत. 1 ग्राम पंचायत अजित पवार गटाकडे आहे. तर 1 स्थानिक आघाडीकडे आहे. आता भाजपा आमदार राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. नुकताच जवळा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच सुशिल सुभाष आव्हाड यांनी भाजपात प्रवेश केला. सरपंच सुभाष आव्हाड यांनी सदस्यांसह राम शिंदे यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला. युवा नेते प्रशांत शिंदे यांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे. जवळा ग्रामपंचायत स्थानिक आघाडीने जिंकली होती.
हे संकेत रोहित पवार यांच्यासाठी फारसे चांगले नाहीत
जवळा ही जामखेड तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता हे संकेत रोहित पवार यांच्यासाठी फारसे चांगले नाहीयत. कारण ग्रामपंचायत निवडणूक निकालातून मतदारांचा कल कुठल्या दिशेला आहे, ते कळून येतं.
कर्जत जागा 6
भाजप 3
राष्ट्रवादी शरद पवार गट 1
राष्ट्रवादी अजित पवार गट 1
स्थानिक आघाडी : 1
जामखेड जागा 3
भाजप 2
इतर 1