कोरोनामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चांदी, दर प्रतिटन 25 ते 30 हजार रुपयांवर
एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य माणूस आणि व्यापारी चिंताग्रस्त आहेत. मात्र, दुसरीकडे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोडी घडत आहेत (Orange price increase).
अमरावती : एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसमुळे सर्वसामान्य माणूस आणि व्यापारी चिंताग्रस्त आहेत. संपूर्ण बाजारपेठा ठप्प होताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोडी घडत आहेत (Orange price increase). संत्राला सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे संत्राचा 12 हजार रुपये टनाचा भाव 25 ते 30 हजारांवर पोहोचला आहे (Orange price increase).
संत्राला भारतासह विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे संत्रामध्ये ‘क’ जीवनसत्व आहे. या जीवनसत्वामुळे शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढते आणि रोगांना दूर ठेवण्यापासून मदत होते. जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, रोगप्रतिकारशक्ती चांगली राहिली तर या आजारापासून बरं होता येतं. त्यामुळे संत्रांची मागणी वाढली आहे.
विदर्भाचा संत्रा आतापर्यंत अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड येथून बांगलादेश, दुबई, तांझानिया या राष्ट्रांमध्ये निर्यात झाला आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी सध्या आनंदी आहेत. गेल्या आठवड्यात संत्राला केवळ 12 हजार रुपये टनाचा भाव होता. ते भाव आज 25 ते 30 हजारावर गेले आहे.
विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ या संत्राचं वरुड मोर्शी तालुक्यात सर्वाधिक उत्पादन होतं. त्यामुळे वरुड मोर्शी तालुका विदर्भाचा ‘कॅलिफोर्निया’ संत्रा उत्पादक प्रदेश म्हणून ओळखला जातो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या संत्र्याची चव ही आंबट गोड आहे. या संत्राला सध्या प्रचंड मागणी होत आहे.