नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी फलोत्पादन प्रशिक्षण, असा करा अर्ज!
नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
नाशिकः सप्टेंबर महिन्यांपासून पावसाने झोडपल्याने जिल्ह्यातला शेतकरी घायकुतीला आला आहे. नांदगाव, मनमाडसह अनेक ठिकाणी दोन-दोन वेळा अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पाण्यात गेला. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
कसे होणार प्रशिक्षण?
नाशिक उपविभागांतर्गत कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातल्या मनुष्यबळ विकास कार्यक्रमामध्ये यंदा 2021-22 मध्ये शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष शेतवार प्रक्षेत्र प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात सहभाग नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी 6 डिसेंबर 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे.
ही कागदपत्रे हवी?
शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करताना अर्जासोबत 7/12 उतारा, आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. 2021-22 एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमात शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यक्रम राबविणेबाबत व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे यांच्याकडून होणार आहे.
अशी होणार निवड?
प्रशिक्षणाचा कालावधी हा 5 दिवसांचा आहे. जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 10 डिसेंबर 2021 रोजी तालुका स्तरावर सोडत काढून जेष्ठता सुचीनुसार प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना निवड पत्र, कार्यक्रमाची तारीख, कार्यक्रमाचे स्वरूप व आवश्यक लोकवाटा याबाबत तालुका स्तरावर कळविण्यात येणार असल्याचेही कळवणचे उपविभागीय कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी कळविले आहे.
शेतकरी चिंतेत
सध्याही शेतकरी चिंतेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यातच आज बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळी रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या पावसाने दुपारनंतर मात्र वेग पकडला. त्यामुळे खरिपानंतर आता रब्बी पिकाचेही हा पाऊस नुकसान करणार की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. विशेषतः सध्याच्या पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
इतर बातम्याः
साहित्य संमेलन वादात भुजबळांची शिष्टाई, भाजप नेत्यांची नाराजी दूर; फडणवीस लावणार हजेरी
Nashik | कंपन्या, शेतकऱ्यांना मिळणार सिंचनासाठी पाणी; कसा अन् कुठे कराल अर्ज, घ्या जाणून