CNG Crisis : उस्मानाबादमध्ये सीएनजीचा दुष्काळ, ड्रायव्हर्स वाहनांत झोपले, लांबच लांब रांगा
उस्मानाबाद आणि सोलापूर परिसरात सीएनजीचा पुरवठा कधीपर्यंत होईल, याचीदेखील माहिती पंपधारकांकडून देण्यात येत नाहीये. त्यामुळे ज्यांना पर्याय नाही, अशी वाहने अजूनही पेट्रोलपंप परिसरात ताटकळलेली आहेत.

उस्मानाबाद : पेट्रोल आणि डिझेलसारख्या वाढत्या महाग इंधनाला स्वस्तातला पर्याय म्हणून सीएनजीकडे (CNG) पाहिलं जातं. प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही हे इंधन उपयुक्त असल्याने ग्राहक वर्गात जागृती होत असून सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहने वापरण्याकडे नागरिकांचा कल आहे. मात्र महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये अजूनही मुबलक प्रमाणात सीएनजी उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा अचानकच सीएनजीचा साठा संपल्यामुळे नागरिकांना त्याचा फटका बसतो. उस्मानाबादमध्ये (Osmanabad CNG) सध्या हीच स्थिती आहे. सीएनजीचा साठा अचानकपणे संपल्यामुळे तेथे आज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रात्रीपासून ताटकळत बसलेल्या वाहनचालकांनी (CNG Shortage) रस्त्यातच गाड्या लावून विश्रांती घेण्याचा मार्ग पत्करला. तर अनेकांनी इतर इंधनाचा पर्याय वापरून पुढचा प्रवास सुरु केला.
उस्मानाबादेत एकाच ठिकाणी सीएनजी
उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त एकाच पेट्रोल पंपावर सीएनजीचा पुरवठा केला जातो. मात्र त्याठिकाणचा सीएनजीचा साठाही काल म्हणजेच रविवारी संध्याकाळी अचानक कमी होऊ लागला. रात्री बारा उरला सुरला साठाही संपल्याचे पेट्रोल पंपाकडून जाहीर करण्यात आले. त्यामुळे एवढा वेळ रांगांमध्ये ताटकळलेल्या वाहनधारकांचा हिरमोड झाला. अनेक वाहनांनी रस्त्यावरच रात्र काढली. सकाळ होताच इतर इंधनाचा पर्याय निवडून अनेकांनी आपला पुढचा प्रवास सुरु केला.
चालकांनी रात्र वाहनातच काढली, सकाळी निघाले
दरम्यान, ऐन रात्रीतून सीएनजीचा साठा संपल्यामुळे अनेक वाहनधारकांनी रात्री रस्त्यावर झोप घेतली. सकाळ होताच इतर इंधनाद्वारे अनेक वाहने पुढील प्रवासाला लागली. उस्मानाबाद आणि सोलापूर परिसरात सीएनजीचा पुरवठा कधीपर्यंत होईल, याचीदेखील माहिती पंपधारकांकडून देण्यात येत नाहीये. त्यामुळे ज्यांना पर्याय नाही, अशी वाहने अजूनही पेट्रोलपंप परिसरात ताटकळलेली आहेत.
सीएनजी वाहनांकडे वाढता कल
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सीएनजीचे दर जवळापस 40 रुपयांच्या फरकाने कमी असतात. त्यामुळे अशी वाहने वापरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. विशेष म्हणजे या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेलवर चालवण्याचाही पर्याय मिळतो. त्यामुळे कुणाचा सीएनजी संपपला तर त्यांना इतर इंधनाचा पर्याय वापरता येतो. सीएनजीवर चालणारे वाहने इलेक्ट्रिक वाहनांप्रमाणेच प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त आहेत.
इतर बातम्या-