पोटापाण्यासाठी चार मजूर सिमेंटचे खांब घेऊन जात होते, ट्रॅक्टर उलटल्याने घात झाला
सिमेंटपासून खांब तयार केले जातात. हे खांब घराच्या किंवा शेतीच्या कंपाऊंडसाठी वापरतात. हे खांबच दोन मजुरांच्या जीवावर उठले.
नीलेश डहाट, प्रतिनिधी, चंद्रपूर : उन्ह असो की पाऊस मजुरांना काम करावेच लागते. त्याशिवाय त्यांच्या घरची चूल पेटत नाही. सध्या विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच भडकला. दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजतापासून दुपारी १२ वाजतापर्यंत काम उरकून घेण्याचा बरेच जण प्रयत्न करतात. दुपारी चारनंतर थोडा उन्हाचा पारा कमी झाल्यावर पुन्हा कामाला लागतात. तर काही जणांना दुपारीही काम करावे लागले. सिमेंटपासून खांब तयार केले जातात. हे खांब घराच्या किंवा शेतीच्या कंपाऊंडसाठी वापरतात. हे खांबच दोन मजुरांच्या जीवावर उठले.
चार मजूर ट्रॅक्टरवर बसले होते
चार मजूर एका ट्रॅक्टरवर बसले होते. ते दुसरीकडे सिमेंटचे खांब पोहचवून देत होते. रस्त्यात ट्रॅक्टर अनियंत्रीत झाला. ट्रक्ट्रर उलटल्याने चार जण ट्रॅक्टरखाली दबले गेले. त्यापैकी दोघांचा घटनस्थळी जीव गेला. दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोघांच्या घटनास्थळी मृत्यू
जिल्ह्यात सिमेंटचे खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने २ जणांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाले. ही घटना मूल तालुक्यातील पिपरी-दीक्षित येथे घडली. मिथुन मराठे (वय ३५) आणि अंकित गंडेशिवार (वय ३०) अशी मृतकांची नावं आहेत.
मृतक केळझर येथील रहिवासी
मृतक आणि जखमी हे सर्व मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी आहेत. केळझर येथून चिंचाळा येथे सिमेंट खांब नेत असताना पिपरी-दीक्षित येथे वळणावर ट्रॅक्टर अनियंत्रित झाला. यात सिमेंट खांब अंगावर पडून २ जण जागीच दगावले. जखमींना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुटुंबीयांवर दुःखाचा आघात
हे दोन्ही मजूर पोटापाण्यासाठी कामाला गेले होते. त्यावर त्यांची उपजीविका चालत होती. पण, आता अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवा दुःखाचे डोंगर कोसळले आहे. कुटुंबीयांचे पालनपोषण कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.