Video : खोके पिच्छा सोडेना… लग्न मंडपातच ’50 खोके, एकदम ओक्के’च्या घोषणा; संतोष बांगर येताच घोषणाबाजी
50 खोके, एकदम ओके या घोषणेमुळे शिंदे गटाचे आमदार आणि खासदार चांगलेच त्रस्त झाले आहेत. जिथे जाईल तिथे त्यांच्यावर टीका होत आहे. आता लग्नाच्या मंडपातही या घोषणा दिल्या जात आहे.
परभणी : शिंदे गटाने बंड केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. खासकरून ठाकरे गटाने शिंदे गटावर प्रचंड टीका केली. शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना खोके मिळाले त्यामुळेच त्यांनी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाच्या आमदारांना डिवचण्यासाठी ठाकरे गटाकडून 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणाही दिल्या गेल्या. विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना तर विधानसभेच्या पायरीवर उभं राहून विरोधकांनी 50 खोके, एकदम ओकेचा नारा देत शिंदे गटाच्या आमदारांना हैराण केलं. आता या घोषणेचं लोण फक्त शिवसैनिकांपर्यंतच राहिलं नाही तर गावागावत पोहोचलं आहे. त्याची प्रचिती शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना पदोपदी येत आहे. सोमवारीच एका लग्नाला गेलेल्या शिंदे गटाच्या आमदारासमोरच 50 खोके, एकदम ओक्केची घोषणाबाजी झाली. त्यामुळे आमदाराचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
ठाकरे गटाकडून शिंदे गटाला नेहमीच `पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा देवून डिवचले जाते. संधी मिळेल तेव्हा ठाकरे गटातील कार्यकर्ते शिंदे गटाच्या आमदार, खासदार, कार्यकर्त्यांना खोक्यावरून डिवचत असतात. आता तर हे लोण चक्क लग्न समारंभापर्यंत देखील पोहचले आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी एका लग्न सोहळ्याला कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. लग्न मंडपात बांगर यांचे आगमन होताच. तेथे पहिल्यापासून उपस्थित असलेल्या ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांचे बांगर यांनी चरण स्पर्श केला. मात्र तेथे उपस्थित कार्यकर्त्यांकडून `पन्नास खोके एकदम ओके`च्या घोषणा झाल्या. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र एकूणच घडलेल्या प्रकारानंतर खोक्याचे लोनआता लग्नसराईपर्यंत पोहोचल्याचे दिसून येते.
आमदाराचा चेहरा पडला
संतोष बांगर लग्नात येताच ‘बॉस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो’ अशा घोषणा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. या घोषणा सुरू असतानाच ’50 खोके, एकदम ओक्के’ची नारेबाजीही सुरू झाली. आमदार बांगर यांच्यासमोरच ही नारेबाजी सुरू झाल्याने बांगर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.
बांगर यांनीही घोषणा देणाऱ्यांना हटकले नाही. त्यांनी घोषणा देऊ दिल्या. मात्र, वधू आणि वर पित्यांची या घोषणेबाजीमुळे चांगलीच अडचण झाली. वऱ्हाडी मंडळींनीच पुढाकार घेऊन या कार्यकर्त्यांना समजावलं. हे राजकीय व्यासपीठ नाही. लगीन घर आहे. लग्नात काही गोंधळ होऊ देऊ नका, असं वऱ्हाडींनी समजावल्यानंतर घोषणाबाजी बंद झाली.
शिवसेनेत फूट अन्…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं होतं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे 39 आमदार फुटले होते. या बंडानंतरही संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. आपण उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही, असं बांगर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते गावाकडे गेल्यावर त्यांचं शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केलं होतं. मात्र, काही दिवसानंतर बांगर यांनी अचानक निर्णय बदलला. बांगरही शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची भावना आहे.