अहमदनगर : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात 2 गटात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन गटातील वाद झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. आता परिसरात शांतता आहे. संबंधित घटना ही संगमनेर तालुक्यापासून 5 ते 6 किमी अंतरावर असलेल्या समनापूर गावात घडली. या वादादरम्यान काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या आहेत. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन जण जखमी झाल्याची देखील माहिती मिळत आहे. संगमनेरमध्ये आज सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा संपल्यानंतर नागरीक घरी जात असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
संगमनेरमध्ये सकल हिंदू समाजाकडून आज भगवा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला गालबोट लागल्याचं मानलं जात आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदू समाजाचे नागरीक या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चानंतर एका गावात दोन गटात वाद उफाळल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा आरोप आहे की, काही तरुण वाहनावरुन आले. त्यांनी ताबडतोब दगडफेक सुरु केली, महिलांना मारण्याचा प्रयत्न केला. लहान मुलांनादेखील मारहाण केली, असा आरोप केला आहे. संबंधित घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या घटनेतील समाजकंटकाचा शोध पोलीस घेत आहेत.
संबंधित घटनेबद्दल पोलिसांकडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “संगमनेरमध्ये आज एक मोर्चा होता. हा मोर्चा दुपारी 12 वाजता संपला. त्यानंतर मोर्चात सहभागी झालेले नागरीक आपापल्या घरी निघाले होते. या दरम्यान संगमनेर शहरापासून पाच ते सहा किमी अंतरावर समनापूर गाव आहे. तिथे काही समाजकंटकांनी घरी जाणाऱ्या नागरिकांच्या एक-दोन गाडीच्या काचा फोडल्या आहेत. दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे”, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
“आरोपींचे फोटो आमच्याकडे आले आहेत. त्यांच्याविरोधात लवकरात लवकर कडक कारवाई करु”, अशी माहिती पोलिसांनी दिली. “आम्ही प्रसारमाध्यमांच्या माझ्यमाधून सांगू इच्छितो की, समनापूरमध्ये शांतता आहे. कुणीही अफवा पसरवू नये. याप्रकरणी चौकशी सुरु आहे”, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
“काही लोक जात असताना दोन-तीन गाड्यांचे काचे फोडले आहेत. त्यावेळी थोडा काळ पळापळ झाले. पण त्यावेळी पोलीस होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता शांतता आहे. याप्रकरणी पुढे कारवाई केली जाईल”, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.