किसान सभेचा लाँगमार्च स्थगित; आंदोलनकर्त्यांना अविश्वास दाखवून नये; सरकारला इशारा
किसान सभेनं म्हटले आहे की, लढायचं कसं हे आम्ही शिकलोय त्यामुळे तीन मंत्र्यांनी जी आश्वासने मोर्चेकऱ्यांना दिली आहेत. त्यावर सरकार अविश्वास दाखवणार नाही अशी खात्री वाटत असल्याचंही डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.
धांदरफळ/अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच आता सरकारकडूनही फक्त अश्वासनांची खैरात होत असल्याने किसान सभेने सरकारविरोधात जोरदार आंदोलन पुकारले होते. शेतकरी, महिला, कामगारांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर धडक मोर्चा काढत सरकारला इशारा दिला होता. त्यावरूनच किसान सभेचं लाल वादळ रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारने आता शेतकऱ्यांना अश्वासन दिले आहे. मात्र सरकारने अश्वासन देऊन शांत बसू नये असा इशाराही किसान सभेच्या आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
राज्यात मागील दोन हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने या पिकांना नुकसानभरपाई देण्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत करण्यात आली नाही.
वन जमिनी, देवस्थान, इनाम, वक्फ, वरकस, आकारीपड, गायरान व घरांच्या तळ जमिनी, नावे करण्याची वारंवार आश्वासने दिली गेली.
त्यामुळे शेतकऱ्यांकडून आंदोलन पुकारण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र जमीन नावे करण्याऐवजी पोलीस व वन विभागाचा दुरुपयोग करत गरीब श्रमिकांना अमानुषपणे मारहाण करून घरे व जमिनींवरून हुसकावून काढण्याच्या मोहिमा सुरू करण्यात आल्या.
सरकारच्या या अश्वासनांमुळे किसान सभेच्या आंदोलन कर्त्यांनी रस्त्यावर उतरून सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर राज्याच्या तीन मंत्र्यांच्या शिष्टाईनंतर किसान सभेने शेतकरी आणि कामगार प्रश्नी काढलेला लाँगमार्च स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघाल्याने किसान सभेचे डॉ.अजित नवले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. कोणत्याही आंदोलनात शंभर टक्के यश मिळतेच अस नाही आणि आंदोलने देखील संपत नाहीत असंही त्यांनी यावेली स्पष्ट केले.
जेव्हा जेव्हा शेतकरी आणि कामगार यांचा प्रश्न समोर येईल त्या-त्यावेळी किसान सभा संघर्ष करत राहिल असा इशाराही किसान सभेने दिला आहे.
यावेळी किसान सभेनं म्हटले आहे की, लढायचं कसं हे आम्ही शिकलोय त्यामुळे तीन मंत्र्यांनी जी आश्वासने मोर्चेकऱ्यांना दिली आहेत. त्यावर सरकार अविश्वास दाखवणार नाही अशी खात्री वाटत असल्याचंही डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.