कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी अमरावती सज्ज, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांसाठी राखीव ऑक्सिजन बेड
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी 80 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे.
अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी 80 खाटांचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. खासगी बालरुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur )यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील चिल्ड्रेन वॉर्डची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उपचार यंत्रणा उभारतानाच संभाव्य लाटेचा धोका कमी करण्यासाठी नियमपालन, सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा व विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. (Amravati ready to fight against corona third wave yashomati thakur inspected reserved children ward)
सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ‘चिल्ड्रेन वॉर्ड’ची पाहणी
यशोमती ठाकूर आज (17 जुलै) अमरावती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील ‘चिल्ड्रेन वॉर्ड’ची पाहणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.
सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे
यावेळी बोलताना पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. या साथीपासून बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपचार सुविधांत वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आले आहे. खासगी बालरुग्णालयांतही खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत.”
नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक
तसेच पुढे बोलताना “संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी ही तयारी करण्यात येत आहे. हे करत असताना लसीकरण कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहनही ठाकूर यांनी यावेळी केले.
दरम्यान, अमरावती शहरात खासगी पेडियाट्रिक कोविड रुग्णालयात पारिजात हॉस्पिटलमध्ये 40 व गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये 60 खाटा उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.
इतर बातम्या :
‘…तर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही’, पनवेलच्या उपमहापौरांचा इशारा
अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून
(Amravati ready to fight against corona third wave yashomati thakur inspected reserved children ward)