जनता कुंभकर्णासारखी झोपलीय; मी कधीपर्यंत लढू? : अण्णा हजारे
देशातील सद्यपरिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, असं मत व्यक्त केलं. तसेच आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे, असा आरोप केला.
अहमदनगर : देशातील सद्यपरिस्थितीवर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनता कुंभकर्णासारखी झोपलीय, असं मत व्यक्त केलं. “आपण आंदोलनं करून लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर पास करण्यात येत आहे. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहे. जनताच कुंभकर्णासारखी झोपली. त्यामुळे हे शक्य आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. त्यांनी देश बचाव जन आंदोलन समितीच्या प्रतिनिधींशी राळेगण सिद्धी येथे चर्चा करताना आपली भूमिका मांडली.
जनआंदोलन समितीने 3 कृषी कायदे, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि देशात सुरू असलेलं सरकारी कंपन्या विकण्याचं धोरण यावर केंद्र सरकार विरुद्ध आवाज उठविण्याचं आवाहन अण्णा हजारेंना केलं होतं. तसेच अण्णा हजारे यांनी तसं न केल्यास केंद्र सरकार आणि अण्णा हजारेंविरुद्ध राळेगणसिद्धीत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर देश बचाव जन आंदोलन समितीचे पदाधिकारी अण्णांना भेटले.
“माझं वय 84 वर्षे आहे, मी कधीपर्यंत लढू?”
अण्णा हजारे म्हणाले, “आता जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे. तेव्हाच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द करेल. माझं वय 84 वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू, देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत आवश्य येईल.”
“देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे”
यावेळी देशात सरकारकडून मागणी नसताना लादण्यात येत असलेल्या कायद्यांवर, सरकारी कंपन्या विकण्याच्या धोरणांवर अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त केली. “देशातील जनता कुंभकर्णासारखी झोपली आहे. ही जनता जोपर्यंत जागी होत नाही आणि सरकार बदलण्याची ताकद उभी करत नाही, तोपर्यंत सरकार झुकणार नाही. असेच कायदे आणि निर्णय लादण्यात येतील,” असंही अण्णा हजारे म्हणाले.
“तुम्ही आंदोलन उभं करा, मी योग्य वेळी सहभागी होईल”
उपस्थिती देश बचाव जन आंदोलनाच्या सदस्यांनी अण्णा हजारे यांना 2012 मधील आंदोलनाची आठवण करून दिली. तसेच तुमच्या शब्दाला दिल्लीत वजन असल्याचं सांगत भूमिका घेण्यास सांगितलं. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, “शेतकरी कायदे, वाढती महागाई, बेरोजगारी याविरुद्ध लढा देण्यासाठी तुम्ही संघटन उभं करा, मला जेव्हा वाटेल तुम्ही योग्य मार्गाने जात आहात, तर मी तुमच्या आंदोलनात आवश्य सहभागी होईल. तसेच मी जागा आहे, मी काही झोपलेलो नाही.”
“दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी संपर्कच साधला नाही”
समितीचे सदस्य मारुती भापकर यांनी अण्णा हजारे यांना दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याची विनंती केली. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, “शेतकरी आंदोलन सुरू होऊन इतके दिवस झाले, पण दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी आपल्याशी संपर्क केला नाही. मी शेतकरी प्रश्नावर 5 वर्षांपासून पाठपुरावा करतोय. केंद्रीय कृषीराज्यमंत्र्यांनी देखील कृषी कायद्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमण्याचा शब्द दिलाय. कोरोनामुळे समिती स्थापन झाली नाही. मात्र तरी मी पाठपुरावा करत आहे.”
देश बचाव जन आंदोलनाच्या समितीत अॅड. रवींद्र रणसिंग, रवींद्र देशमुख, मारुती भापकर, सागर आल्हाट, दुर्गा भोर, मुकुंद काकडे, अॅड. देविदास शिंदे यांचा समावेश होता.
हेही वाचा :
मला तुमच्या भांडणात पडायचं नाही, पण तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो.. : अण्णा हजारे
“असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, मुख्यमंत्र्यांशी बोलणार” निलेश लंकेंच्या भेटीनंतर अण्णा हजारेंचं वक्तव्य
अजित पवारांचं नाव आम्ही कधीपासून घेतोय, ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल; जरंडेश्वरवरील कारवाईनंतर अण्णा हजारेंचा दावा
व्हिडीओ पाहा :
Anna Hazare blame people for current political situation and new farm laws