कोण आहेत रामेश्वर पवळ ज्यांना शिंदे गटाच्या समन्वयकपदी नेमलं?
नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते शिंदे गटात आहेत.
अकोला : शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, शिवसेना पक्षाच्या समन्वयक पदी रामेश्वर पवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल. तसेच पक्ष वाढीसाठी आपण सहकार्य कराल. अशी अपेक्षा शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नियुक्ती पत्र देताना व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीत सर्वकाही सुरळीत असताना रामेश्वर पवळ यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून ते शिंदे गटात आहेत. आता शिंदे गटाने त्यांना चांगली ऑफर दिली आहे.
२२ वर्षे शरद पवार यांच्यावर निष्ठा
रामेश्वर पवळ हे विदर्भातील वंजारी समाजाचे नेते आहेत. रामेश्वर पवळ यांनी शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून २२ वर्षे काम केलं. पवळ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात झाला. पण, त्याचे काम हे वाशिम आणि अकोला जिल्ह्यात जास्त आहे. रामेश्वर पवळ यांनी सुरुवातीला तत्कालीन राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे स्वीय साहाय्यक म्हणून काम केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्त्वाची पदे
गावंडे पिता आणि पुत्र यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यात रामेश्वर पवळ यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. रामेश्वर पवळ यांनी शरद पवार यांचा विश्वास संपादित केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रामेश्वर पवळ यांनी काही महत्त्वाची पदं भूषवली. त्यात अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे विभागीय समन्वय, प्रदेश चिटणीस, प्रदेश संघटक म्हणून त्यांनी काम केलं.
याशिवाय अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलाचे ते अध्यक्ष होते. रामेश्वर पवळ यांना समन्यवक पदी नियुक्ती दिल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना बुस्ट मिळणार आहे. पवळ समन्यवय कसा साधतात, हे पाहावं लागेल.