VIDEO: एअर इंडिया विकणाऱ्या आणि रेल्वे विकायला निघालेल्यांनी एसटीवर बोलू नये; बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
ज्यांनी एअर इंडिया विकली. रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार नाही.
नगर: ज्यांनी एअर इंडिया विकली. रेल्वे विकायला निघाले आहेत. त्यांनी एसटीवर बोलू नये. त्यांना एसटीवर बोलण्याचा बिलकूल अधिकार नाही, असा हल्लाच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर चढवला आहे.
मीडियाशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी हा हल्लाबोल केला आहे. एसटी कामगारांच्या हिताची आम्ही जपणूक करत आहोत. या संपातून तोडगा काढण्याचा परिवहन मंत्री अनिल परब प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री या प्रश्नात लक्ष घालत असून त्यावर काही ना काही मार्ग निघेलच, असं थोरात यांनी सांगितलं. काही लोक एसटीचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. हे उघड आहे. ते सर्वांनाच दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
पद्मश्री मिळावा म्हणून गोखलेंचं विधान
यावेळी त्यांनी कंगना रणावत आणि अभिनेते विक्रम गोखलेंवरही टीका केली. कंगना रणावत काय बोलते? स्वातंत्र्याबाबत बोलण्याची तिची लायकी तरी आहे का? कंगनाचे बोलणे चुकीचे आहे. वादग्रस्त बोलते आणि संरक्षण मिळवते. पद्मश्रीही मिळतो. कंगनाला मिळालेला पद्मश्री आणि संरक्षण पाहून विक्रम गोखलेही बोलायला लागले आहेत. त्यांनाही पद्मश्री मिळून जाईल, असा चिमटा यांनी काढला.
कंगना, गोखलेंचा बोलविता धनी कोण?
कंगना काय आणि गोखले काय… हे दोघेही सहज बोलत नाहीत. यामागे कोणी तरी आहे. हे लोक आता देशाच्या राज्य घटनेकडेही वळतील. पण देश राज्यघटनेप्रमाणेच चालला पाहिजे हे लक्षात ठेवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या या घटनेत सर्व संतांच्या विचाराचे सार आहे. पण काही लोक आज स्वातंत्र्यावर शंका घेतात. उद्या ते राज्यघटनेवरही बोलतील, असं ते म्हणाले.
टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे आहेत?
ठरावीक लोकांसाठी कृषी कायदे तयार करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. या सरकारने जनतेच्या विरोधात सातत्याने निर्णय घेतले. पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून नागरिकांना वेठीस धरले. कोरोनाच्या काळात मदत करायची सोडून टाळ्या-थाळ्या वाजवायला सांगितलं गेलं. हे टाळ्या-थाळ्या वाजवणारे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, धुळे-नंदुरबार, साताऱ्यात 10 जागांसाठी आज मतदान