एससी, एसटी, ओबीसींच्या राजकीय हक्कासाठी बसपाची वाशिममध्ये ‘राजकीय हक्क परिषद’
वाशिममध्ये येत्या 26 सप्टेंबरला एससी, एसटी, ओबीसींची 'राजकीय हक्क परिषद' आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी रविवारी दिली.
मुंबई : राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीयांना त्यांच्या राजकीय हक्कांसंबंधी जागरूक करण्यासह त्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेकरिता सुरु असलेल्या लढ्यात बहुजन समाज पार्टी सदैव अग्रेसर आहे. या अनुषंगाने वाशिममध्ये येत्या 26 सप्टेंबरला एससी, एसटी, ओबीसींची ‘राजकीय हक्क परिषद’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी रविवारी दिली. (BSP holds ‘Political Rights Council’ in Washim for political rights of SCs, STs and OBCs)
‘संवाद यात्रे’ दरम्यान अॅड. ताजने यांनी त्यांचा गृहजिल्हा वाशिम येथे राज्याचे प्रभारी प्रमोद रैना यांच्या उपस्थितीत पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ‘राजकीय हक्क परिषदे’च्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आल्या असून या कार्यक्रमात इतर पक्षातील ज्येष्ठ नेते बसपात प्रवेश करणार असल्याचे देखील ताजने म्हणाले. केंद्र तसेच राज्यातील सरकारी सेवेत अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती तसेच ओबीसींकरिता राखीव असलेली अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे तत्काळ भरण्यात यावी, अशी मागणी अगोदरपासूनच बसपा प्रमुख मायावती यांची राहीली आहे.
सरकारी नोकऱ्यांसह राजकीय हक्कासंबंधी समाज बांधवांना जागरूक करण्याच्या अनुषंगाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून एससी, एसटी तसेच ओबीसींच्या राजकीय हक्काची लढाई बसपा लढेल, असे ते यावेळी म्हणाले. बैठकीत प्रदेश सचिव अविनाश वानखेडे, इ. एस खंडारे, नरेंद्र खडसे, मधुकर जुमळे, संघनायक मोरे, योगेश जगताप, सुधाकर काजळे, राहुल सुर्वे, राहुल राऊत तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विदर्भात संवाद यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद : प्रमोद रैना
विदर्भात सुरू असलेल्या संवाद यात्रेला कार्यकर्ते, पदाधिकरी तसेच नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. बसपाचा जनाधार विदर्भात वाढत असल्याची प्रचिती यावरून येते. मायावती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तरूण नेतृत्व आकाश आनंद यांच्या नेतृत्वात पक्ष विविध महानगर पालिकांमध्ये सत्ताप्राप्तीच्या दिशेने अग्रेसर असल्याचे मत प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केले. एससी, एसटी, ओबीसींसह सर्वसमावेश विकासासाठी बसपा कटीबद्ध असल्याचे रैना यावेळी म्हणाले.
इतर बातम्या
काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा
असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला
नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही
(BSP holds ‘Political Rights Council’ in Washim for political rights of SCs, STs and OBCs)