बुलढाणा : बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातील संग्रामपूर येथील गटविकास अधिकारी आणि चार ग्रामसेवक यांनी कार्यालयीन वेळेतच ओली पार्टी केल्याची धक्कादायक घटना घडलीयं. विशेष म्हणजे या ओल्या पार्टीचा व्हिडीओ सध्या तूफान व्हायरल होताना दिसतोयं. या व्हिडिओमुळे (Video) प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडालीय. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे कार्यालयीन वेळेत ओली पार्टी करण्यासाठी एक भाड्याने रूम देखील घेतल्याची माहिती कळते आहे. तर हा व्हायरल व्हिडिओ एका ग्रामसेवकांच्या रूमवरील असून या रूमवर गटविकास अधिकारी एस. एम पाटील आणि चार ग्रामसेवक हे ओली पार्टी (Party) करत होते.
मागील दीड वर्षांपासून बिडिओ पाटील हे संग्रामपूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असून कार्यालयीन वेळेत कधीच हजर नसतात, अशी नागरिकांची कायमच तक्रार असते. बिडीओच जाग्यावर नसल्याने कर्मचारी लोकांचे काम करत नाहीत. त्यामुळे नागरिकांना खाली हात परतावे लागते. बुलढाणा जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना यापूर्वी एक महिन्यासाठी सक्तीच्या रजेवर ही पाठवले होते. मात्र त्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले.
या अगोदर बिडीओ पाटील हे जालना जिल्ह्यातील मंठा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतांनी 5 में 2020 रोजी त्यांच्याविरुद्ध ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई येथून निलंबनाचा आदेश झाला होता. या आदेशामध्ये वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे ,कार्यालयामध्ये वारंवार अनुपस्थिती राहणे, बैठकीत अनुपस्थित राहणे, कार्यालयात मध्य प्राशन करणे इत्यादी बाबी आढळून आल्या होत्या.
गटविकास अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम तीन व नियम 28 चा भंग केल्याचा ठपका सुध्दा त्यांच्यावर लागला होता. त्यामुळे त्यांचे निलंबन ही झाले होते. परंतु या महाशयावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे ते पुन्हा रुजू झाले. संग्रामपूर गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पाटील हे कधीच कार्यालयामध्ये उपस्थित राहत नसल्याने नागरिकांची कामे होत नाहीत.