सर्जा राजा सुस्साट, गुलालाची उधळण आणि गावकऱ्याांचा एकच कल्ला; पारनेरमध्ये रंगला बैलगाडा स्पर्धेचा थरार
पारनेर तालुक्यातील चोंभूत येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच गावात ही स्पर्धा पार पडत आहे. या स्पर्धेनिमित्त तमाशा आणि लोकनाट्याचे आयोजनही करण्यात आलं आहे. तसेच स्पर्धकांसाठी बक्षीसांची लयलूटही असणार आहे.
चोंभूत : पारंपारिक पद्धतीने सजवलेले सर्जा राजा शर्यतीसाठी सज्ज झालेले… अंगावर हळद माखलेली… ही शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दुतर्फा केलेली गर्दी… अखेर सर्जा राजा धावू लागतात… ग्रामस्थही त्यांच्या पाठीपाठी धावू लागतात… सर्जा राजा धावतात तशी धूळ उडते… गुलालांची उधळण होते… एकच कल्ला होतो…. संपूर्ण वातावरण भारून जातं…. पारनेर तालुक्यातील चोंभूत येथील बैलगाडा स्पर्धेतील हे चित्रं. अख्ख्या पारनेर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही असणार आहे.
पारनेर तालुक्यातील चैतन्य संपत्ती नवनाथ सिद्ध यांच्या समाधीने पावन झालेले तीर्थक्षेत्र चोंभूत येथे श्री हनुमान, श्री. कानिफनाथ, श्री. मुक्ताई देवी या ग्राम दैवतांचा भव्य तीन दिवसीय (दिनांक 12,13,14 मार्च ) यात्रा महोत्सवाचे आयोजन चोंभूत ग्रामस्थांनी केले आहे. यात पहिल्या दिवशी अभिषेक, मांडवडहाळे, शेरनी प्रसाद, ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन तसेच बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुपर स्प्लेंडर आणि एलसीडी टीव्ही
चोंभूत यात्रेतील बैलगाडा शौकीनांसाठी लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आयोजन केले आहे. यात मेगा फायनलसाठी प्रथम क्रमांक म्हणून सुपर स्प्लेंडर, द्वितीय क्रमांकासाठी पॅशन प्रो, तृतीय क्रमांकासाठी स्पेंडर, चतुर्थ क्रमांकासाठी एच. एफ. डिलक्स आणि पाचवा क्रमांकासाठी राजाराम धोंडीबा शिंदे यांच्या स्मरणार्थ एल. सी. डी टीव्ही आदी बक्षीसांचा समावेश आहे.
यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात बैलगाडा शौकीन हजेरी लावणार आहेत.यात्रा उदघाटन आ. निलेश लंके, बबनराव शेळके (चेअरमन, शेळके ग्रुप ), विजूभाऊ औटी ( नगराध्यक्ष पं. समिती पारनेर )यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण मधुकरराव उचाळे, वसंतराव कवाद, डॉ. भास्करराव शिरोळे, अमृता रसाळ(गव्ह. कॉन्ट्रॅक्टर )यांच्या हस्ते होणार आहे.
तीन दिवसीय यात्रा महोत्सवात रात्री करमणूकीसाठी 13 मार्च रोजी जीवन गौरव पुरस्कार विजेती मंगला बनसोडेसह नितीनकुमार करवडीकर यांचं लोकनाट्य पार पडलं. आज 14 मार्च रोजी रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर यांच्या भव्य लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखेर बैलगाडा शर्यतीस परवानगी
नुकत्याच चोंभूत गावातील ग्रामपंचायत निवडणुका पार झाल्यानंतर सहाजिकच राजकीय गटांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते. परिणामी एका गटाकडून काही कारणास्तव बैलगाडा शर्यती वर बंदी आणली होती मात्र दुसऱ्या गटाने जिल्हाधिकारी यांच्याकडून रीतसर परवानगी मिळून आणल्याने यात्रा भरवण्याचा मार्ग मोकळा झाला.यात्रा पार्श्वभूमीवर पारनेर पोलिसांकडून चोख बंदोबस्त राहणार असल्याची माहिती पो. नि. संभाजी गायकवाड यांनी दिली.
अनेक वर्षांपासून असलेली बैलगाडा शर्यत बंदी आणि कोरोनाचे संकटामुळे यात्रा नीटश्या भरत नव्हत्या.आता हे संकट दूर झाले आहे. तसेच बैलगाडा शर्यतीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घेऊन यात्रा महोत्सव मोठ्या आनंदाने भरवत आहोत. तरी परिसरातील बैलगाडा रसिकांनी सहभागी होण्याचे आवाहन गंगाधर शेळके, चोंभूत (माजी उपसभापती कृ. उ.बाजार समिती पारनेर ), यात्रा कमितीब प्रमुख बाळासाहेब नरवडे आणि ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग म्हस्के यांनी केले आहे.