कोल्हापूर: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे सरकार इंधनावरील कर कमी करेल असं वाटत नाही. तशी दानत या सरकारची नाही. त्यामुळे मी आशावादी नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना काळात आघाडी सरकारने हजार कोटीचा चेक दाखवला होता. तो कुठे गेला? व्हॅक्सिन खरेदी करण्यासाठीचा तो चेक होता. तो कुठे गायब झाला माहीत नाही. त्यानंतर व्हॅक्सिनचा खर्चही केंद्रानेच केला. आता पेट्रोल-डिझेलवरील जीएसटी त्यांनी कमी केला पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारने कमी केला नाही. केंद्राकडे बोट दाखवलं. शेवटी केंद्रानेच कमी केला. केंद्राने अबकारी कर कमी केला आहे. त्यामुळे पाच आणि दहा रुपयाने पेट्रोल डिझेलवरील भाव कमी होतील. आता महाराष्ट्रानेही कर कमी केला पाहिजे. अबकारी कर कमी केल्याने आपणही इंधनावरील दर कमी करू अशी काही दानत महाराष्ट्र सरकारची नाही. त्यामुळे मी काही आशावादी नाही, असं पाटील म्हणाले.
ठाकरे सरकार सकारात्मक भूमिका घेणार नाही याची मला शंभर टक्के खात्री आहे. त्यांना केवळ केंद्राकडे बोट दाखवणं येतं. ते स्वत: भूमिका घेणार नाहीत. आज मला काही शेतकऱ्यांचे सकाळपासून फोन येत आहेत. केवळ 1400 रुपये जमा झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी केंद्राची वाट न पाहता 9600 कोटी दिले. केंद्राने 1800 कोटी दिली. ही एनडीआरएफची मदत सर्व देशसााठीची आहे. ती प्रातिनिधीक आहे. तुमची मदत तुम्ही केली पाहिजे असं केंद्राने म्हटलं होतं. आम्ही 9600 कोटीचा प्रस्ताव दिला. आम्हाला 1800 कोटी मिळाले. बाकीचे आम्ही महाराष्ट्राच्या तिजोरीतून काढले. यांनी केंद्राकडे बोट दाखवून शेतकऱ्यांना केवळ 1400 रुपये दिले. मला सिन्नरमधून शेतकऱ्यांचा फोन आला. 1400 रुपये मिळाल्याचं सांगितलं. या शेतकऱ्याकडे अडीच हेक्टर जमीन आहे. मात्र, सर्वांना याच रेंजमध्ये पैसे आले आहेत. त्यामुळे केंद्राने अबकारी कर कमी केल्यानंतरही महाराष्ट्र सरकार अजून 5 रुपये कमी करेल असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.
संपूर्ण महाराष्ट्रात काळी दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी आहे. मराठवाड्यात 38 लाख हेक्टर पीक वाहून गेलं. 11 लाख हेक्टर जमीन वाहून गेली. आणि 1400 आणि 2400 रुपयांचे चेक आले. सोसायटीचे हप्ते भरायचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचंही असंच आहे. 29 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 4 हजार रुपये देण्यात आले. त्यात अडीच हजार रुपये बोनस. घरातील ताईलाही आम्ही 5 हजार रुपये देतो. एसटी कर्माचाऱ्यांचा सतरा महिन्याचा पगार राहिला आहे. या सर्वांची दिवाळी काळी होत आहे. त्यामुळे आम्ही काळी दिवाळी साजरी करत आहोत. या सरकारची इच्छा शक्ती नाही. समन्वय नाही. 15 दिवस पीकं पाण्याखाली असताना पंचनामे कसे करता. देवेंद्र फडणवीसांनी पंचनामे न करता निधी दिला, असंही ते म्हणाले.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 4 November 2021 https://t.co/wBggRzYdlT #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 4, 2021
संबंधित बातम्या:
दिवाळीच्या मुहूर्तावर मोठा दिलासा; गोडतेल लिटरमागे 7 रुपयांनी स्वस्त
(chandrakant patil reaction on fuel price)