IPS अधिकाऱ्याला रस्त्यात भेटला ‘छोटा UPSC गुरु’, VIDEO प्रचंड व्हायरल
चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना रस्त्यात सायकलिंग करत असताना एक आठवी इयत्तेतला सोहम भेटतो. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी या मुलाशी संवाद साधतात. यावेळी सोहमचं बोलणं ऐकून पोलीस अधीक्षक चांगलेच भारावले. त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
चंद्रपूर | 19 सप्टेंबर 2023 : आपल्याला आयुष्याशी खूप तक्रारी असतात. आपल्या आयुष्यात किती संघर्ष आहे याच्याविषयी आपण नेहमी तक्रार करतो. आपण नेहमी आपल्या आयुष्यात किती कष्ट आहेत, या विषयी चर्चा करत असतो. इतकी मेहनत केल्यानंतरही आपल्याला यश मिळत नाही म्हणून आपण नाराज होतो. याबाबत सातत्याने इतरांकडे नाराजी व्यक्त करतो. अर्थात सर्वच तशी चर्चा करत नाहीत. पण नकारात्मक गोष्टींकडे माणूस जास्त लवकर आकर्षिला जातो. अशा प्रत्येकासाठी हा व्हिडीओ एक प्रेरणा देणारा आहे.
एक आठवी इयत्तेत शिकणारा मुलगा आयएएस होण्याचं स्वप्न पाहतोय. विशेष म्हणजे आयएएस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे, अभ्यास कसा करावा, किती तास अभ्यास करावा, आठवड्यात किती सिनेमे पाहावे आणि मित्रांसोबत किती वेळ खेळावं याबद्दल त्याला खूप चांगली माहिती आहे. तो याबाबत सविस्तर आणि मुद्देसूद विश्लेषणही करतोय. त्याचं हे विश्लेषण पाहून एक बडे पोलीस अधिकारी देखील भारावून गेले. त्यांनी या मुलासोबत संभाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होतोय.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षकांची चिमुकल्याशी चर्चा
व्हायरल झालेल्या या संबंधित व्हिडीओत सायकलवर मुलाशी संभाषण करणारी व्यक्ती हे बडे पोलीस अधिकारी आहेत. ते चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी आहेत. त्यांना सायकलिंग करण्याची आवड आहे. त्यामुळे ते सायकलिंग करायला बाहेर पडले होते. ते सायकलिंग करत असताना डोंगरहळदी गावाजवळ पोहोचले. तिथे त्यांना रस्त्यावर एक मुलगा सायकल चालवताना दिसला. परदेशी यांनी त्याच्याशी संवाद साधला.
परदेशी आणि सोहमचं होतंय कौतुक
पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी अतिशय मनमोकळ्यापणाने या मुलाशी संवाद साधला. यावेळी या मुलाने देखील अतिशय बिनधास्तपणे परदेशी यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या मुलाचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास पाहून रविंद्रसिंह परदेशी हे चांगलेच भारावले. त्यांनी या मुलासोबत संवादाचा एक व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सर्वजण या व्हिडीओतील मुलाचं आणि परदेशी यांचं कौतुक करत आहेत.
या व्हिडीओतील मुलाचं नाव सोहम सुरेश उईके असं आहे. सोहम हा जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठवीत शिकतो. तो डोंगरहळदी गावात वास्तव्यास आहे. सोहमने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्यासोबत बोलताना यूपीएससी, शिक्षण, रोजगार, याबाबत घडाघडा विचार मांडले. विशेष म्हणजे सोहमच्या नकळत परदेशी यांनी ही बातचित कॅमेऱ्यात कैद केली. आता त्यांच्या गप्पांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोहम नेमकं काय सांगतोय?
सोहमला आयएएस व्हायचंय. आयएएस होण्यासाठी रोज आठ तास अभ्यास करायला हवा. तसेच मित्रांसोबत एक तास खेळायला हवं आणि आठ तास झोपायला हवं. तसेच एका आठवड्यात एक सिनेमा नक्कीच बघायला हवा. त्यामुळे मन फ्रेश राहतं, असं सोहम पोलीस अधीक्षकांसोबत बोलताना सांगतो.
सोहमने त्याचे मामा देविदास मेश्राम हे आपले मार्गदर्शक आहेत, असं सांगितलंय. यावेळी परदेशी साहेबांनी सोहमचे आई-बाबा नेमकं काय काम करतात याविषयाची माहिती जाणून घेतली. आपल्याला सर्वच स्तरातून ज्ञान मिळत असतं. फक्त जे चांगलं आहे ते आत्मसात करावं आणि जे चांगलं नाही ते सोडून द्यावं, असं सोहम परदेशी यांना सांगतो.
आमच्या उईके कुटुंबात जवळपास दोन पिढ्यांपासून कुणीही नोकरीवर लागलेलं नाही. त्यामुळे आपण जर नोकरीवर लागलो तर चांगली मोठी नोकरी करावी. आपण आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या बुद्धिचं योगदान देऊ शकतो, आपण करु शकतो, असं सोहम म्हणाला.
शालेय शिक्षणात हडप्पा संस्कृतीपासून, गणितात लसावी, मसावी शिकवलं जातं. वेगवेगळ्या इयत्तेत ते सविस्तर शिकवलं जातं. त्यामुळे ज्ञान हे वाढत जातं. शिक्षण हे कुऱ्हाड आहे. तिचा वापर करत राहावा लागतो. नाहीतर तिला जंग लागतो, असं मत सोहम मांडतो.
याशिवाय आपण खूप मेहनत केल्यानंतरही आयएएस नाही बनलो तरी नाराज व्हायचं नाही. याउलट आपण आदर्श नागरीक घडू शकतो, असं सोहम म्हणतो. यावेळी पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सोहमला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं किंवा मदत लागली तर आपण करु, असं आश्वासन दिलं.