आरोग्याचं कारण देऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवणार? दिल्लीत हालचाली; बड्या नेत्याचा मोठा दावा
राज्यात 28 कॅबिनेट मंत्री कार्यरत असून नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. पुणे येथील ध्वजारोहणाचा वाद विकोपाला गेला आणि तिथे राज्यपालांना ध्वजारोहण करायचे आहे असे परिपत्रक निघाले.
गडचिरोली | 14 ऑगस्ट 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते साताऱ्यातील आपल्या दरे या गावी विश्रांतीसाठी गेले होते. त्यामुळे ते पुण्यातील चांदणी चौक उड्डाण पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. शिंदे यांच्या आजारावर ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाण्यात मृत्यूचं तांडव असताना मुख्यमंत्री मात्र विश्रांती घेत आहेत, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आजारपणावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळच विधान केलं आहे.
आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला जाईल. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही खेळी असावी असा कयास वडेट्टीवार यांनी लगावला. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांचा सहभाग अत्यंत कमी होता हे निदर्शनास आणून देत सीएमओ कार्यालय आणि प्रवक्ता यांच्यात त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून परस्परविरोधी विधान केली जात असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
दिल्लीत हालचाली सुरू
दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोग्याचं कारण देत शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्ली हायकमांडचा प्रयत्न सुरू आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांची खेळी निष्प्रभ करण्यासाठी अजितदादा यांना मुख्यमंत्रीपद देण्याची खेळी केली जाऊ शकते, असंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हंगामी राज्यपाल नेमा
कोणत्या पालकमंत्र्यांना कोणत्या जिल्ह्याचं ध्वजारोहण करायचं यावरून सरकारमध्ये मतभेद होते. त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण कोण करणार, याचे परिपत्रक निघाले असताना यावर विजय वडेट्टीवार यांनी तिकट प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात हंगामी राज्यपालांची नेमणूक करून ध्वजारोहण करावे, असा खोचक सल्ला त्यांनी भाजप सरकारला दिला आहे.
राज्यात 28 कॅबिनेट मंत्री कार्यरत असून नऊ ते दहा जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत. पुणे येथील ध्वजारोहणाचा वाद विकोपाला गेला आणि तिथे राज्यपालांना ध्वजारोहण करायचे आहे असे परिपत्रक निघाले. यापेक्षा दुसरे दुर्दैव असू शकत नाही. ध्वजारोहणासाठी जर वाद होत असतील तर हंगामी राज्यपाल नेमावे, जिथे जिथे ध्वजारोहणाचा वाद आहे तिथे हंगामी राज्यपाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करावे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यामुळे राज्याची अस्मिता आणि राष्ट्रीयता धुळीस मिळवण्याचे काम भाजप सरकार करत असून यांना जनता माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.