LIVE : “बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आहे तो, आमच्या मागण्या पूर्ण करतील”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), खासदार धैर्यशील माने यांनी कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री कालच कोल्हापूरला जाणार होते. मात्र हवामान विभागाने कोल्हापूरला पावसाचा रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आला.
दरम्यान, उद्धव ठाकरे पहिल्यांदा कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी या गावाची पाहणी केली. नृसिंहवाडी हे गाव आठवडाभरापासून पाण्यात आहे. पाऊस बंद झाला असला तरी पाणीपातळी अवघी दोन टक्के कमी झाली आहे. गावातील सर्व लोकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. मात्र जनावरांचा चारा, लाईट पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाणी काही प्रमाणात ओसरलं असलं तरी कमरेएव्हढ्या पाण्यातून लोक घरापर्यंत पोहोचत आहेत.
मुख्यमंत्री बाळासाहेबांचे वंशज, आमचं म्हणणं जरुर ऐकतील
शिरोळ तालुक्यातील पाहणीदरम्यान, मुख्यमंत्र्यांभोवती ग्रामस्थानी एकच गर्दी केली होती. प्रत्येक जण आपआपली कैफियत थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत होते. शिरोळमध्ये पाहणी करत असताना, मुख्यमंत्र्यांना काही नागरिकांनी मागून आवाज दिला. “शिरोळ गाव आठवडाभर पाण्यात आहे. हे पाणी सांगलीतील जत तालुक्याला वळवलं तर हा दरवर्षी महापूर येणार नाही. आमचा शिरोळ तालुका महाराष्ट्राला निधी देईल इतका मोठा तालुका आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढा” असं इथल्या नागरिकाने मुख्यमंत्र्यांना सांगितलं.
मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंचे वंशज आहेत, ढाण्या वाघ आहे तो महाराष्ट्राचा. आम्ही आवाज दिल्यावर ते थांबले, त्यांनी आमचं ऐकून घेतलं. मुख्यमंत्री आमच्या मागण्या पूर्ण करतील, असा विश्वास आहे, असं इथल्या नागरिकाने सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी करुन योग्य मदत द्यावी, जाहीर केलेली तुटपुंजी दहा हजारांची मदत ही स्वच्छता आणि जेवणखाण्याला पुरेल ही मदत वाढवावी अशी मागणी पूरग्रस्तांनी केली आहे.
VIDEO : मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा
मुख्यमंत्र्यांचा दौरा कसा असेल?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ८.४० वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्टरीय विमानतळ, सांताक्रूझकडे रवाना होतील. विमान तळावरुन कोल्हापूरला जातील. कोल्हापूर विमानतळावरुन मोटारीने शिरोळ-नृसिंहवाडी रोडकडे रवाना होतील. शिरोळ-नृसिंहवाडी रोड येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. त्यानंतर शाहूपूरी ६वी गल्ली, कोल्हापूर नाईक अॅण्ड कंपनी येथे पुरामुळे बाधित झालेल्या भागाची पाहणी करतील. त्यानंतर पंचगंगा हॉस्पीटल गंगावेश ते शिवाजी पूल रस्ता येथील पुरामुळे बाधीत भागाची पाहणी करतील. कोल्हापूरमधील पूरबाधित भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 ते 1.30 पर्यंत करतील.
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता कोल्हापूरमधील पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. उद्धव ठाकरे दौरा आटोपून मुंबईकडे रवाना होतील.
संबंधित बातम्या
पूरानं नुकसान झालेल्यांना तातडीने विम्याची किमान 50 टक्के द्या, मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
‘आम्हाला नोटीस देणं आवश्यक होतं, आमची अटक बेकायदेशीर’, राज कुंद्राच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद