काँग्रेसला बंडाळीने घेरलं? प्रदेश उपाध्यक्षांच्या कन्येकडून सत्यजित तांबे यांचा प्रचार; तांबे यांना काँग्रेसमधूनच बळ?
सत्यजित तांबे जळगाव जिल्ह्यात प्रचार करत आहेत. जळगाव जिल्ह्यात मेळावे घेण्यावर तांबे यांनी भर दिला आहे. त्यांच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची मुलं हजेरी लावताना दिसत आहेत.
जळगाव: पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी समोर आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात आधी डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यानंतर त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ही बंडाळी ताजी असतानाच आता काँग्रेसच्या थेट प्रदेश उपाध्यक्षाच्या मुलीने सत्यजित तांबे यांना पाठिंबा देऊन त्यांच्या प्रचारात भाग घेतला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. सत्यजित तांबे यांना पक्षातूनच बळ मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच जळगावमधील राजकारणात येत्या काळात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेतही मिळताना दिसत आहेत.
सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करून नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसने सत्यजित तांबे यांना निलंबित केलं आहे. तसेच त्यांचे वडील सुधीर तांबे यांनाही निलंबित करण्यात आलं आहे. काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे.
तर्कवितर्कांना उधाण
परंतु, काँग्रेसच्या नेत्यांची मुलं सत्यजित तांबे यांचा प्रचार करताना दिसत आहेत. जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील यांनी तांबे यांचा प्रचार केला आहे.
तांबे यांच्या प्रचाराच्या मंचावर केतकी पाटील दिसून आल्या. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधूनच बळ मिळत असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे.
लेवा भवनात प्रचार सभा
सत्यजित तांबे जळगाव जिल्ह्यात प्रचार करत आहेत. जळगाव जिल्ह्यात मेळावे घेण्यावर तांबे यांनी भर दिला आहे. त्यांच्या मेळाव्याला काँग्रेस नेत्यांची मुलं हजेरी लावताना दिसत आहेत. जळगाव जिल्ह्यातील लेवा भवनमध्ये तांबे यांनी प्रचारासाठी मेळावा घेतला होता. त्यावेळी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील यांची कन्या डॉ. केतकी या मंचावर उपस्थित होत्या.
दोन दिवसांपूर्वीच आशीर्वाद घेतला
त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. दोन दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील या उल्हास पाटील यांच्या घरी आल्या होत्या. शुभांगी पाटील यांनी उल्हास पाटील यांचे आशीर्वादही घेतले. मात्र, लगेचच उल्हास पाटील यांची कन्या तांबे यांच्या स्टेजवर दिसल्याने अनेकांना कोड्यात टाकलं आहे. या खेळी मागचं कारण काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
वेगळ्या राजकीय गणितांची नांदी?
डॉ उल्हास पाटील हे काँग्रेस पक्षाचे कट्टर नेते मानले जातात. परंतु त्यांच्या कन्या तांबे यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तांबे याना भाजपने जाहीर पाठिंबा दिला नसला तरी त्यांची भाजपशी जवळीक असल्याची चर्चा आहे. असं असताना केतकी पाटील यांनी तांबे यांना पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील ही वेगळ्या राजकीय गणिताची नांदी तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.