किरीट सोमय्या यांच्याविरोधात काँग्रेस गुन्हा दाखल करणार, नाना पटोले यांची माहिती
सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्यावरदेखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी माहिती दिलीय.
बुलडाणा : मागील अनेक दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहेत. याआधी सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेते यांच्यावरदेखील आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. सोमय्या यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. आता काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तशी माहिती दिलीय. सध्या सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ( मल्टिस्टेट) मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या बँकेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी 53.72 कोटी रुपयांचे मनी लॉंडरींग केल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय.
किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करणार
“किरीट सोमय्या यांनी कितीही आरोप केले तरी काहीही फरक पडत नाही. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. उद्या काँग्रेस भाजप नेते किरीट सोमय्या वर गुन्हे दाखल करणार आहेत,” असे नाना पटोले म्हणाले.
किरीट सोमय्या यांनी यापूर्वी कोणते आरोप केले ?
मागील अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांवर वेगवेगळे आरोप करत आहेत. शिवसेना खासदार भावना गवळी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहनमंत्री अनिल परब, मंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच अन्य बड्या नेत्यांवर त्यांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी बँका, साखर कारखाने तसेच अन्य खासगी कंपन्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केले आहेत, असं सोमय्या यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर यातील बऱ्याच मंत्र्यांविरोधात वेगवेगळ्या तपास संस्थांनी कारवाई केली. ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग, अशा संस्थांनी सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर चौकशी सुरु केलीय. बरेच मंत्री चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक तसेच निटकवर्तीय यांचादेखील समावेश आहे.
बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमधील ( मल्टिस्टेट ) 53.72 कोटी कोणाचे
भाजप नेते किरीट सोमय्या आज बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ( मल्टिस्टेट ) मोठी आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप केलाय. “बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ( मल्टिस्टेट ) एकूण 53.72 कोटी रुपये सापडले आहेत. हे पैसे नक्की कुणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार आहोत,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
सप्टेंबर महिन्यात बुलढाणा येथील बुलडाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ( मल्टिस्टेट ) आयकर विभागाच्या धाडी पडल्या. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते. आता पर्यंत 1200 हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत आहे, या खात्यांद्वारा 53.72 कोटी मनी लॉंडरींग करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आयकर विभागाने हे 53.72 कोटी रुपये असलेली 1200 बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले आहेत, असंदेखील सोमय्या यांनी म्हटलंय.
इतर बातम्या :
(congress will file case against bjp leader kirit somaiya said nana patole)