नगर : एमपीएससीत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिचा अचानक गूढ मृत्यू झालाय. आधी दर्शना आठ दिवस गायब झाली. त्यानंतर राजगडावर तिचा मृतदेह सापडला. सडलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे तिचा मित्र राहुल हंडोरे या काळात तिच्या सोबत होता. तोही गायब झाल्याने या प्रकरणाचं गूढ वाढलं आहे. राहुल हंडोरे कुठे गेला? तो कुठे लपला तर नाही ना? की त्याचंही काही बरं वाईट झालंय? याचा पोलीस शोध घेत आहेत. जोपर्यंत राहुल सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचं सत्य बाहेर येणार नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस जंग जंग पछाडत आहेत.
दर्शना पवार हिची हत्या झाल्याचं पोस्टमार्टम अहवालातून उघड झालं आहे. राजगडावर ती ट्रेकिंगला गेली होती. तिथेच तिचा खून झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. तिच्यासोबत तिचे काही मित्र होते. राहुल हंडोरे हा मित्र सुद्धा तिच्यासोबत होता. पण तोही तेव्हा पासूनच गायब आहे. त्यामुळे या हत्येचा संशय त्याच्यावर बळावला आहे. पण राहुल गेला कुठे? असा सवाल केला जात आहे. राहुल लपून बसलाय की त्याचंही बरं वाईट झालंय? असा प्रश्न पोलिसांनाही पडला असून पोलीस त्या दिशेने शोध घेत आहेत.
एमपीएससीच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेली दर्शना पवार ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. तर राहुल हंडोरे हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शहा या गावचा आहे. तोही एमपीएससीची तयारी करत होता. शहा या गावात त्याचं विटांचं जुनाट घर आहे. या घराला कुलूप लावलेलं आहे. घर ओस पडलेलं आहे. घरात कुणीच नसल्याने त्याचे कुटुंबीय कुठे गेले? असा प्रश्नही केला जात आहे.
दर्शनाच्या मृत्यूमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. दर्शनासारख्या अत्यंत हुशार मुलीचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दर्शनाला न्याय मिळावा म्हणून आता मराठा समाज मैदानात उतरला आहे. दर्शनाच्या हत्येच्या निषेधार्थ आज कोपरगाव शहरात सकल मराठा समाजाने मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चाला शेकडो लोक उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दर्शना हिच्या हत्येने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दर्शना खूप हुशार होती. भविष्यात ती काही तरी झाली असती. घराचा नावलौकीक तिने वाढवला असता. पण त्या आधीच तिची हत्या करण्यात आलीय. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे, असं दर्शनाचे मामा उत्तम आगळे यांनी केली आहे.