चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला! नगरसेवकाला मारहाण करण्याचे कारण काय?
काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. नागरकर हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना दुचाकीस्वारांनी भर चौकात त्यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली. हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.
चंद्रपूर : चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला झालाय. पाळतीवर असलेल्या 3 युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर (corporator Nandu Nagarkar) यांच्यावर हल्ला केला. नागरकर यांची दैनंदिनी माहीत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भर चौकात क्रिकेट बॅटने मारहाण (Beaten with a cricket bat) केली. तोंडावर मास्क घातलेल्या या युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. नागरकर काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष ( former city president of Congress)- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत. हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आलाय. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केलाय.
हल्लेखोरांनी तोंडावर घातला होता मास्क
नंदू नागरकर नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले. त्यांच्यासमोर तीन हल्लेखोर दुचाकीने आले. त्यांनी नंदू यांचा रस्ता अडवला. मराठी सिटी शाळा चौकात ही घटना घडली. हल्लेखोरांनी मास्क घातले होते. त्यामुळं त्यांना ओळखता आले नाही. हे हल्लेखोर कोण आहेत, हे अद्याप समजले नाही.
मारहाण करणारे क्रिकेट खेळणारे असावे
ही मारहाण करताना या हल्लेखोरांनी क्रिकेटच्या बॅटचा वापर केला. याचा अर्थ हल्लेखोर हे क्रिकेट खेळणारे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जातो. मारहाण केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नंदू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.