अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाली. यात मुलगा व वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई लक्ष्मी बछले गंभीर अवस्थेत आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलंय. 7 बालकांना चंद्रज्योतीच्या विषारी बिया खाल्ल्यानं विषबाधा झाली.
मुलगा आयुष बछले (वय 7 वर्ष) याचा शुक्रवारी मृत्यू झाला, तर वडील बुधराज बछले यांचा शनिवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याशिवाय विषारी बिया खाणाऱ्या 7 मुलांवर काटकुंभ आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
गेल्या अनेक दशकांपासून मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे. गेल्या 3 महिन्यात 49 बालमृत्यू झालेत. मेळघाट हा घनदाट जंगलाचा परिसरआहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
सद्यातरी मेळघाट परिसरात आदिवासींना उपचार घ्यायचा असेल तर जंगलातून वाट काढत जावं लागतं. मेळघाटात चिखलदरा व धारणी या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र सुविधा व डॉक्टरांचा अभाव आहे. या ठिकाणी कुपोषणाच्या समस्यासह लहान मुलांना पोटफुगी सारखे आजार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायम स्त्री रोग,व बालरोग तज्ञ असायला हवा, असं स्थानिक आदिवासी लोकांचं म्हणणं आहे.
महिला व बालकल्याण खातं हे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहेत. त्यांनी बालमृत्यूसंदर्भात आढावा घेतला आहे. तर मेळघाट मधील बालमृत्यू प्रमाण थांबव याकरिता अभियान राबविण्यात येतंय. मात्र कुपोषण व मेळघाटातील विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी कायम डॉक्टर असतील का? हा खरा प्रश्न आहे.