मुख्यमंत्रीपदाबाबत दीपक केसरकर यांचं सर्वात मोठं विधान; युतीत चाललंय काय?
आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा अपघात आणि सुरक्षा याचा काही संबंध नाही. त्यांची सुरक्षा पूर्वत आहे. हा त्यांच्या वयाचा परिणाम आहे, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कोल्हापूर : येत्या 2024नंतर मुख्यमंत्री कोण होणार? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आल्यानंतर फडणवीस यानी अत्यंत सावध उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय संसदीय बोर्डच घेणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांचं हे विधान शिंदे गटासाठी सूचक विधान मानलं जात आहे. पुढचा मुख्यमंत्री शिंदे गट नाही तर भाजपच ठरवणार असल्याचं फडणवीस यांच्या विधानातून सूचित होत आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे. फडणवीस यांचं हे विधान आल्यानंतर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनीही सूचक विधान केलं आहे. त्यामुळे युतीत नेमकं काय चाललंय? असा सवाल केला जात आहे.
मंत्री दीपक केसरकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. हा संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. मुख्यमंत्री कोण होणार हे दोघांनी मिळून ठरवायचे आहे. या अगोदर फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचं सांगत होते. काही अॅडजस्टमेंट असू शकते. पहिलं तुम्ही व्हा, मी नंतर होतो असे असू शकते. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री व्हा म्हंटले होते. आम्ही दोघांचे नेतृत्व मान्य करतो. राज्याला आश्वासक चेहरा लाभलेला आहे, असं म्हणत दीपक केसरकर यांनी युतीतील घडामोडींवर नेमकं बोट ठेवलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
म्हणून दुसरी जाहिरात दिली
यावेळी त्यांनी शिंदे गटाने दिलेल्या वादग्रस्त जाहिरातीवरही भाष्य केलं. मुळात ही जाहिरात मुख्यमंत्र्यांना दाखवून दिलेली नव्हती. कार्यकर्त्यांकडून ही जाहिरात दिली होती. ती थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तोपर्यंत प्रिंटिंगला जाहिरात गेली होती. त्यामुळे त्यात बदल करणे शक्य नव्हते. म्हणून नंतर दुसरी जाहिरात दिली, असं केसरकर यांनी सांगितलं.
आमची गद्दारी कशी?
शरद पवार यांनी आमच्याशी डबल गेम केल्याचं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शरद पवारांनी ज्या पद्धतीने उठाव केला त्याला जनतेने स्वीकारले होते. त्यांचा उठाव आणि आमची गद्दारी असं कसं होईल? असा सवाल करतानाच आमचा पक्ष संपवण्याचा प्रयत्न झाला होता म्हणून उठाव झाला. महाराष्ट्राच्या। इतिहासत हे फक्त दोनदा घडले. पवार त्यानंतर चार वेळा मुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे सुद्धा पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एवढ्या मोठ्या पक्षाची फरपट झाली. मूळ पक्ष बाजूला गेला. एवढी वर्ष नेतृत्व करणारी माणसे बाजूला गेली. याचं आम्हालाही दुःख होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
राऊतांना सीरिअस घेऊ नका
हे सरकार औटघटकेचं आहे, असं संजय राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. औटघटकेच सरकार म्हणारे संजय राऊत कोण आहेत? संजय राऊत यांना फारसे सीरियस घेऊ नका, असंही ते म्हणाले.