धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, थेट शिंदे समितीलाच दाखवले काळे झेंडे
मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे यांनी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी माहिती आणि पुरावे समितीकडे सादर केले. यावेळी महत्त्वाची माहिती मिळाली. पण शिंदे समिती आजचं कामकाज आवरुन परतत असताना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर वेगळाच प्रकार बघायला मिळाला.
संतोष जाधव, Tv9 मराठी, धाराशिव | 27 ऑक्टोबर 2023 : राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याच्या हेतूने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. ही समिती आज धाराशिव जिल्ह्यात दाखल झाली. ही समिती जिल्ह्यात येत असल्याने मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. समितीने आज दिवसभर कागदपत्रांची छाननी केली. समिती कामकाज आटोपून संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून परतीच्या मार्गाला लागली असता संध्याकाली साडेचारच्या सुमारास मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
मराठा कार्यकर्त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना आज धाराशिवमध्ये काळे झेंडे दाखवले. वेळकाढू समितीचा धिक्कार असो, गो बॅक, गो बॅक अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे असाच प्रकार पुण्यात घडला. पुण्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. इथे देखील पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
संदीप शिंदे यांच्या समितीने राज्य शासनाकडे अहवाल जमा करण्यासाठी काही दिवस मुदतवाढ मागितली होती. राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंत समितीला मुदतवाढ दिली आहे. एकीकडे मराठा नेते जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे समितीचं काम सुरु आहे. सरकारने अल्टिमेटम पाळला नसल्याचे कारण देत जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यातच सरकारने या समितीला मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तापलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा अशा 459 नोंदी सापडल्या
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा अशा 459 नोंदी सापडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने तब्बल 40 लाख 49 हजार कागदपत्रे, दस्त आणि नोंदी यांची तपासणी केली. यात 407 नोंदी ह्या 1948 सालापूर्वीच्या असून 1948 ते 1967 या काळात केवळ 52 नोंदी सापडल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.
मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे यांनी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी माहिती आणि पुरावे समितीकडे सादर केले. जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात संपूर्ण यंत्रणा कागदपत्रे तपासणीसाठी कामाला लावली होती. त्यात महसूल, शिक्षण, मुद्रांक,पोलीस, कारागृह, भूमी अभिलेख यासह कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका तपासण्यात आल्या. सर्वाधिक कुणबी नोंदी या शिक्षण विभागाकडे सापडल्या.